नीरा-देवघरच्या कालव्यातून गळती
By Admin | Updated: March 29, 2017 00:02 IST2017-03-29T00:02:29+5:302017-03-29T00:02:29+5:30
नीरा-देवघर धरणाच्या उजव्या कालव्याचे दुसरे आवर्तन आठ दिवसांपासून चालू आहे़ मात्र कालव्याचे अस्तरीकरणाचे काम

नीरा-देवघरच्या कालव्यातून गळती
नेरे : नीरा-देवघर धरणाच्या उजव्या कालव्याचे दुसरे आवर्तन आठ दिवसांपासून चालू आहे़ मात्र कालव्याचे अस्तरीकरणाचे काम रखडल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होऊन लाखो लिटरची नासाडी होत आहे़
तालुक्यातील पश्चिम, दक्षिण भागात वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे़ या भागातून दोन धरणांचे दोन कालवे गेलेले आहेत़ या कालव्याच्या पाण्यावर परिसरातील काही शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग, ऊस, कांदा, भाजीपाला या पिकांची लागवड केलेली आहे़ कालव्याची दोन आवर्तने वेळेत सोडल्याने पिके चांगली आली आहेत. एकीकडे वीसगाव खोऱ्यात शेतकरी धोम-बलकवडी धरणाचे आवर्तन सोडण्याची मागणी करीत आहेत़ दुसरीकडे नीरा-देवघर धरणाचे आवर्तन सोडण्यात आले आहे़ मात्र नीरा-देवघर धरणाच्या उजव्या कालव्याला मोठ्या प्रमाणावर गळती आसल्याने ठिकठिकाणी लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़
कालव्याच्या अतिगळतीमुळे कालव्याखालील शेती, पिके पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे़ कालव्याच्या अस्तरीकरणाचे रखडलेले काम कधी पूर्ण होणार व पाण्याची गळती कधी थांबणार? असा प्रश्न नागरिक, शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)
कालव्याची कामे अपूर्ण आहेत, याकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाकडून २२ मार्चला जागतिक जलदिन साजरा केला जातो, पाणीबचतीसाठी बऱ्याच काही उपाययोजना, घोषणा केल्या जातात़ मात्र, गळती व पाण्याच्या नासाडीकडे दुर्लक्ष होते. एकीकडे भोर तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, तर दुसरीकडे कालव्याच्या गळतीने लाखो लिटर पाणी वाया जात आहे़