पुणेकरांची पावसाची प्रतीक्षा संपली! गेल्या काही वर्षात यंदा मान्सूनचे आगमन लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 12:01 PM2021-06-08T12:01:18+5:302021-06-08T12:25:10+5:30

हवामान विभागाचा अंदाज, गेल्या ३० वर्षाच्या पाहणीनंतर मॉन्सूनच्या आगमनाच्या नवीन तारखा केल्या जाहीर

In the last few years, early arrival of monsoon in Pune this year, usually arrives on 8th June | पुणेकरांची पावसाची प्रतीक्षा संपली! गेल्या काही वर्षात यंदा मान्सूनचे आगमन लवकरच

पुणेकरांची पावसाची प्रतीक्षा संपली! गेल्या काही वर्षात यंदा मान्सूनचे आगमन लवकरच

Next
ठळक मुद्दे सध्या मान्सून कमजोर पडला आहे. १२ जूननंतर पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

पुणे: केरळमध्ये ३ जून रोजी आगमन झालेल्या मॉन्सूनने यंदा पुढील तीनच दिवसात वेगाने प्रगती करत ५ जून रोजी महाराष्ट्रात आणि ६ जून रोजी पुण्यात प्रवेश केला. गेल्या काही वर्षातील पुण्यात इतक्या लवकर मॉन्सूनचे आगमन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

यापूर्वी ९ जून २०१८ रोजी मॉन्सून पुण्यात दाखल झाला होता. सर्वसाधारणपणे पुण्यात मॉन्सून हा ८ जूनला दाखल होत असे. हवामान विभागाने गेल्या ३० वर्षाच्या पाहणीनंतर गेल्या वर्षी मॉन्सूनच्या आगमनाच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पुण्यात मॉन्सूनचे आगमन हे आता १० जूनला अपेक्षित आहे. मात्र, यंदा मॉन्सूनने पुण्यात ६ जून रोजी आगमन केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. 

याबाबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, मॉन्सूनचे आगमन हे केरळच्या दक्षिणकडून दरवेळी होत असते. त्यानंतर तो पहिल्या टप्प्यात कर्नाटकातील कारवारपर्यंत मजल मारत असतो. यंदा सुरुवातीला बंगालच्या उपसागरातील शाखेची वाटचाल काहीशी धिम्या गतीने झाली. त्याचवेळी अरबी समुद्रातील शाखेने जोरदार वाटचाल केली. यंदा मॉन्सूनचे आगमन हे दक्षिणेकडून होण्याऐवजी केरळच्या उत्तरेकडून झाले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जो पूर्वी कारवारपर्यंत येणार्‍या मॉन्सूनने यंदा पुण्यापर्यंत मजल मारली आहे. आता तो काहीसा कमजोर पडला आहे. पुढील चार दिवस त्यात फारसा बदल होणार नाही. १२ जूननंतर पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

यापूर्वी पुण्यात मॉन्सून दाखल झालेल्या तारखा

६ जून २०२१
१४ जून २०२०
२४ जून २०१९
९ जून २०१८
२० जून २०१६

Web Title: In the last few years, early arrival of monsoon in Pune this year, usually arrives on 8th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.