कोरेगाव बंधाऱ्यात मोठी पाणीगळती
By Admin | Updated: January 31, 2017 03:51 IST2017-01-31T03:51:52+5:302017-01-31T03:51:52+5:30
भामा-आसखेड धरणाच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. नदीपात्रात वेळोवेळी सोडलेले पाणी गळक्या बंधाऱ्यातून

कोरेगाव बंधाऱ्यात मोठी पाणीगळती
आंबेठाण : भामा-आसखेड धरणाच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. नदीपात्रात वेळोवेळी सोडलेले पाणी गळक्या बंधाऱ्यातून वाहून जात असल्याने नदीच्या दुतर्फा असणारी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.
भामा नदीवर भामा-आसखेड हे मातीचे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या कालव्याचे काम रखडले असून धरणात जवळपास आठ टीएमसी पाणीसाठा होत असतो. पावसाळा संपल्यानंतर खालच्या भागातील नागरिकांच्या मागणीनुसार आणि गरज असेल तेव्हा धरणातून पाणी सोडले जाते. त्यामुळे भामा नदीपात्राच्या कडेला असणाऱ्या शेतीची तहान भागते, तसेच नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पाणी योजनादेखील सुरू राहतात. नदीपात्रात पाणी साचून राहावे, म्हणून ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत.
परंतु अनेक ठिकाणी या बंधाऱ्याला बसविण्यात आलेले लोखंडी ढापे हे जीर्ण झाल्याने ते गळू लागले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यात कितीही पाणी सोडले तरी ते वाहून जात आहे.
जुने आणि जीर्ण झालेले ढापे बदलणे किंवा त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या पाण्याच्या भरवशावर भामा खोऱ्यातील अनेक शेतकऱ्यांकडून बागायती शेती केली जात आहे. त्यामधून ऊस, पालेभाज्या, कांदापिक, तसेच अनेक नगदी पिकांचे उत्पन्न घेतले जात आहे.
गळती थांबवली नाही तर या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पाणी योजना बंद पडतील, तर विहिरींची पाणीपातळी कमी होईल. (वार्ताहर)