पैशाच्या आमिषाने जमिनी लुटणारे पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST2021-08-23T04:14:35+5:302021-08-23T04:14:35+5:30
तळेगाव ढमढेरे : गरजू व्यक्तीला पैशाचे आमिष दाखवून जमिनींचे कुलमुखत्यार पत्र तसेच खरेदीखत करून घेत जमिनींची परस्पर विक्री करणाऱ्या ...

पैशाच्या आमिषाने जमिनी लुटणारे पोलिसांच्या जाळ्यात
तळेगाव ढमढेरे : गरजू व्यक्तीला पैशाचे आमिष दाखवून जमिनींचे कुलमुखत्यार पत्र तसेच खरेदीखत करून घेत जमिनींची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा शिक्रापूर पोलिसांनी पर्दाफाश करत सात जणांवर गुन्हे दाखल करून चौघांना अटक केली आहे. तर तिघेजण फरारी आहेत.
शिक्रापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी बाबू यलाप्पा मोरे (वय २७, रा. बाफना मळा, बाबूरावनगर, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिल्याने अरुण कैलास गवळी (वय ३३, रा. मोटेवाडी, ता. शिरूर, जि. पुणे), विजय भाऊसाहेब घावटे (वय २६, रा. बाबूरावनगर, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे), सोमनाथ फक्कड बोऱ्हाडे (वय २७, रा. रामलिंग ग्रामीण, ता. शिरूर, जि. पुणे), दत्तात्रय भाऊसाहेब यादव (वय ३३, रा. यादववाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर), राहुल सुखदेव गायकवाड (रा. कोहोकडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर), विकास प्रकाश थिटे (रा. केंदूर, ता. शिरूर, जि. पुणे), शुभम गोविंद पाचर्णे (रा. शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे) आदी सात जणांविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. शिक्रापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर (बाबूरावनगर) येथील बाबू मोरे यांना पैशाची अडचण असल्याची माहिती गुन्हे दाखल झाले असलेल्या व्यक्तींना समजताच त्यांनी बाबू मोरे यांना तुम्हाला आम्ही पैसे देतो असे सांगितले. मात्र त्याबदल्यात आम्हाला काहीतरी तारण द्या असे सांगितले. त्यामुळे मोरे यांच्या दहा गुंठे जमिनीचे कुलमुखत्यारपत्र करून घेण्यासाठी अरुण गवळी, विजय घावटे, सोमनाथ बोऱ्हाडे, दत्तात्रय यादव, राहुल गायकवाड, विकास थिटे, शुभम पाचर्णे यांनी बाबू मोरे यांना तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे आणले. सदर ठिकाणी त्यांना प्रथम दहा गुंठे जागेचे कुलमुखत्यार पत्र समोर दाखवून दिवसभर दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात बसवून ठेवले. त्यांनतर अचानकपणे वेगळीच कागदपत्रे समोर ठेवून घाई गडबड करून व कार्यालय बंद होणार आहे, लवकर सह्या करून घ्या कागद तुम्हाला भेटणार आहे, घरी गेल्यानंतर वाचा असे म्हणून बाबू मोरे यांच्या तब्बल १३२ गुंठे जमिनीचे खरेदीखत करून घेतले. त्यांनतर लगेचच त्यापैकी ९१ गुंठे जमिनीची विक्री दुसऱ्या व्यक्तीला करून टाकली. दरम्यानच्या काळामध्ये मोरे यांनी संबंधित व्यक्तींना दुय्यम निबंधक कार्यालयातील कागदपत्रांची मागणी केली असता सदर कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. तसेच मोरे यांनी वारंवार सदर व्यक्तींकडे याबाबत विचारणा केली असताना त्यांना दमदाटी करण्यात आली. त्यामुळे आपली पैशाच्या आमिषाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिक्रापूर पोलीस ठाण्यात मोरे यांनी फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी संबंधित सात जनावर गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी अरुण गवळी, विजय घावटे, सोमनाथ बोऱ्हाडे, दत्तात्रय यादव या चौघांना अटक करून त्यांना शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना मंगळवार (दि.२४ ऑगस्ट) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे तपास करत आहेत.