नाथांची वाडी येथे आठ लाख रुपयांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST2021-07-14T04:13:58+5:302021-07-14T04:13:58+5:30
संगीता मल्हारी सूळ (वय ४७ , रा. ठोंबरेवस्ती, नाथाचीवाडी, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे. ...

नाथांची वाडी येथे आठ लाख रुपयांचा ऐवज लंपास
संगीता मल्हारी सूळ (वय ४७ , रा. ठोंबरेवस्ती, नाथाचीवाडी, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे. यवत ते नाथाचीवाडी रस्त्यालगत टकले कुटुंबाचे घर आहे. फिर्यादी महिलेने तिचे व तिच्या बहिणीचे सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम घरातील एका लोखंडी पेटीत ठेवले होते.
काल (दि. ११) रोजी रात्री फिर्यादी महिला व तिची आई हौसाबाई टकले या जेवण करून एका खोलीला कुलूप लावून दुसऱ्या खोलीत झोपल्या. सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम कुलूप लावलेल्या बाजूच्या खोलीत होती. पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान फिर्यादीची भावजय शोभा दत्तात्रय टकले या झोपेतून उठल्या असता त्यांना बंद खोलीचा कोयंडा व कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरातील इतर व्यक्तींना जागे करून सांगितले.
सर्वांनी बाजूच्या खोलीत जाऊन पाहणी केली असता घरातील कपात व पेटीतील सर्व सामान अस्ताव्यस्त होते, तर सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास होती. फिर्यादीचे सोन्याचे गंठण, कर्णफुले, लेडीज अंगठ्या, डोरले, नथ, बदाम, बोरमाळ, चेन रिंगा, चांदीचे पैंजण व रोख ३ लाख १० हजार रुपये असा एकंदरीत ७ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला.
यवत पोलिसांना याबाबतची फिर्याद मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला असून श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.
नाथाचीवाडी (ठोंबरेवस्ती) ता. दौंड येथील चोरी झालेले घर, चोरीनंतर घरात पडलेले सामान.