ललित पाटील, दोन मैत्रिणी, ‘ससून’चे नशिले रॅकेट अन् पुणे कनेक्शन

By नितीश गोवंडे | Published: October 30, 2023 10:26 AM2023-10-30T10:26:38+5:302023-10-30T10:27:21+5:30

हिंदी चित्रपटही फिके पडतील असे खुलासे ललित पाटील प्रकरणात रोज होत आहेत

Lalit Patil, two girlfriends, the drug racket of 'Sassoon' and the Pune connection | ललित पाटील, दोन मैत्रिणी, ‘ससून’चे नशिले रॅकेट अन् पुणे कनेक्शन

ललित पाटील, दोन मैत्रिणी, ‘ससून’चे नशिले रॅकेट अन् पुणे कनेक्शन

नितीश गोवंडे, प्रतिनिधी

हिंदी चित्रपटातील कथानकही फिके वाटेल असे खुलासे कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाईंड ललित पाटील प्रकरणात रोज होत आहेत. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ससून रुग्णालयाबाहेर १ किलो ७१ ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त केले आणि अवघ्या ३४ वर्षांच्या ललित अनिल पाटील याच्या ड्रग्ज रॅकेटचा नवा पॅटर्न उजेडात आला. ससून रुग्णालयात त्याला मिळालेली व्हीआयपी ट्रिटमेंट, त्याला मदत करणाऱ्या त्याच्या दोन मैत्रिणी ही सर्व पटकथा सामान्य माणसाची मती गुंग करणारी आहे. पुणे हे ड्रग्ज रॅकेटचे ‘हब’ म्हणून ओळखले जात असताना गुन्हेगार, पोलिस आणि ससून रुग्णालयाचे कनेक्शनही बाहेर आले आहे.

ससून रुग्णालयातील कैदी वॉर्डात अनेक महिने उपचार घेणाऱ्यांमध्ये फक्त बड्या आरोपींचाच समावेश आहे. उर्वरित कैदी रुग्णांवर किरकोळ उपचार करून त्यांना पुन्हा येरवड्यात पाठवले जाते. मात्र ‘खास’ व्यक्तींवर व्हीआयपी पद्धतीने उपचार सुरू होते. ललित हा दररोज ससूनपासून जवळच असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी जायचा. दोन-तीन तास थांबून तो पुन्हा ससूनमध्ये यायचा. त्याला दररोज रुग्णालयाच्या कँटीनमधून आवडणारे खाद्यपदार्थ पोहोचवले जात होते. तो ज्या कैदी वॉर्डात उपचार घेत होता, तेथील सीसीटीव्ही बंद होते. पोलिस आणि रुग्णालय ललितने मॅनेज केले होते. हे मॅनेजमेंट पैशांच्या जोरावर सुरू होते. त्याच्या नाशिकच्या एका मैत्रिणीचीही सध्या जोरात चर्चा सुरू आहे.

मूळ नाशिककर असलेला ललित पाटील गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातून त्याचे अमली पदार्थांचे रॅकेट चालवत होता. केमिकल इंजिनीअर असलेला त्याचा भाऊ जर्मन उर्फ भूषण पाटील त्याला मदत करत होता. भूषणने ड्रग्ज बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. सुरुवातीला या भावंडांनी रांजणगाव येथील बंद पडलेल्या कारखान्यात १३२ किलो एमडी बनवले. त्यातील ११२ किलो त्यांनी विकले. त्यातून हा खेळ सुरू झाला. मात्र उर्वरित २० किलो ड्रग्जसह ललितला स्थानिक पोलिसांनी पकडले होते.

ललित पाटील ससून रुग्णालयातून डील ठरवत असे. त्याचा भाऊ भूषण मालाचा पुरवठा करत असे. नाशिकमध्ये ललितचा मोठा बंगला असून, मदत करणाऱ्यांचीही तो चांगली बडदास्त ठेवायचा.

ससूनचे अधिष्ठाताच करत होते ललितवर उपचार...

ललित पाटील पलायन प्रकरणानंतर गप्प असलेले ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे आजपर्यंत प्रत्येक प्रश्नाला गोपनीय असल्याचे सांगत बोलण्यास टाळत होते. पुणे पोलिसांनी ससूनमधील वैद्यकीय नोंदी ताब्यात घेतल्यानंतर ललितवर ससूनचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर हेच उपचार करत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

Web Title: Lalit Patil, two girlfriends, the drug racket of 'Sassoon' and the Pune connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.