चाकण : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरपारची लढाई उभारली आहे. काल (दि.२७) अंतरवली सराटी येथून निघालेल्या त्यांच्या आरक्षण यात्रेने आज (दि.२८) छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरीची माती माथ्याला लावून मुंबईच्या दिशेने कूच केले. या यात्रेत सामील होण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांचा जनसागर उसळला असून, हजारो वाहनांच्या ताफ्यामुळे पुणे-नाशिक महामार्ग आणि चाकण-तळेगाव मार्ग भगवामय झाले आहेत.
हजारो वाहनांच्या ताफ्यामुळे वाहतुकीवर परिणाम
संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या यात्रेत राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी हजारो वाहनांचा ताफा उभारला आहे. आज (दि.२९ ) पहाटे पासूनच पुणे-नाशिक आणि चाकण तळेगाव महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून चाकण व महाळुंगे पोलिसांनी चौख बंदोबस्त ठेवत औद्योगिक क्षेत्रातील बसेस, अवजड वाहने वळवून पर्यायी मार्ग दाखवले आहेत. तसेच चाकण व परिसरातील शाळांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.
समाजाची एकजूट व स्वागत सोहळे
यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांसाठी खेड तालुक्यातील मराठा समाज व ग्रामस्थांनी ठिकठिकाणी चहा, नाष्टा, पाणी आणि जेवणाची सोय केली आहे. रस्त्यांवर स्वागत कमानी, भगवे झेंडे, घोषवाक्ये आणि फलक लावून यात्रेचे स्वागत करण्यात आले. वातावरणात "जय जिजाऊ, जय शिवराय" आणि "मराठा आरक्षण हक्क आमचा" अशा घोषणांचा निनाद घुमला. या निमित्ताने समाजातील विविध संघटना, स्वयंसेवी संस्था आणि गावोगावी युवक मोठ्या संख्येने पुढे आले.
आरक्षणासाठी आरपारची लढाई
मनोज जरांगे पाटील यांनी शिवनेरीच्या पवित्र मातीतिलक करून “आमचा संघर्ष हा आता शेवटपर्यंतचा” असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषणास बसणार असून,राज्य सरकारला ठोस निर्णय घेण्यासाठी आंदोलनाचा महत्वाचा टप्पा मानला जात आहे. मराठा समाजाच्या आत्मसन्मानाची ही लढाई आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या यात्रेकडे लागले आहे.
आगामी घडामोडींवर राज्याचे लक्ष
या आरक्षण यात्रेचे राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय परिणाम पुढील काही दिवसांत प्रकर्षाने दिसतील.एका बाजूला मराठा समाजात उत्साह आणि लढाऊ जिद्द आहे,तर दुसरीकडे वाहतूक, कायदा-सुव्यवस्था आणि औद्योगिक हालचालींचा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर होणारे उपोषण आणि त्याला मिळणारा प्रतिसाद यावरच पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.