लसीकरण नियोजनाचा अभाव; मात्र कर्मचारी पार्टीमध्ये दंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:11 IST2021-05-07T04:11:27+5:302021-05-07T04:11:27+5:30

-- आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण नियोजनाचा अभाव आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या निवासी सदनिकेच्या पार्किंगमध्ये ...

Lack of vaccination planning; But stunned at the staff party | लसीकरण नियोजनाचा अभाव; मात्र कर्मचारी पार्टीमध्ये दंग

लसीकरण नियोजनाचा अभाव; मात्र कर्मचारी पार्टीमध्ये दंग

--

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण नियोजनाचा अभाव आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या निवासी सदनिकेच्या पार्किंगमध्ये नॉनव्हेज आणि मासवाडीच्या शाही पार्टी होत आहेत. पार्टीत सात किलो नॉनव्हेज आणि मासवडीचा फडशा कर्मचाऱ्यांनी पाडला. पार्टीचे नियोजन कुणी केले हे कळाले नसले तरी कोरोना काळातही बुधवारी सायंकाळी पार पडलेल्या या शाही पार्टीची आळंदीत चर्चा रंगली असून, एकत्रित येऊन केलेल्या पार्टीबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गेल्या महिन्याभरात ग्रामीण रुग्णालयामार्फत केल्या जाणाऱ्या लसीकरणात वशिलेबाजी होत असल्याचा आरोप ज्येष्ठ नागरिकांकडून केला जात आहे. तर रेमडेसिविर इंजेक्शनही राजकीय व्यक्तींना वाटप केल्याची शहरात चर्चा आहे. त्यातही लाभार्थ्यांना कर्मचाऱ्यांची अरेरावी सहन करावी लागते. एकीकडे रुग्णालयात लसीकरणाचे नियोजन नाही. तर दुसरीकडे ग्रामीण रुग्णालयाच्याच पार्किंगमध्ये डॉक्टर, कर्मचारी व कर्मचाऱ्यांचे नातेवाईकही नॉनव्हेजवर ताव मारत आहेत.

कोविड काळात काम करून कर्मचारी थकले असतील म्हणून पौष्टिक आहार घेत असतील, असेही समर्थन काही जण करत आहेत. खरे तर कोविड काळात एकत्रित येऊन पार्टी आयोजित केलेले आढळून आल्यास पोलीस कारवाई करत आहेत. मात्र, याठिकाणी हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांना पार्टीचा थांगपत्ताही लागला नाही.

याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. जाधव म्हणाले, आरोग्य कर्मचारी काम करतात म्हणून एका सामाजिक कार्यकर्त्याने जेवण दिले. गैरसमज नको. त्याठिकाणी मर्यादित कर्मचारी होते. तसेच गर्दी बिलकुल नव्हती.

Web Title: Lack of vaccination planning; But stunned at the staff party