मुळशीच्या पर्यटन विकासात सोयीसुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:19 IST2021-03-13T04:19:03+5:302021-03-13T04:19:03+5:30
पौड : मुळशी तालुका निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. पर्यटकांना आकर्षित करणारी वनसंपदा, नद्या, धरणे, किल्ले, डोंगररांगा, घाट परिसर, विविध देवस्थाने, ...

मुळशीच्या पर्यटन विकासात सोयीसुविधांचा अभाव
पौड : मुळशी तालुका निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. पर्यटकांना आकर्षित करणारी वनसंपदा, नद्या, धरणे, किल्ले, डोंगररांगा, घाट परिसर, विविध देवस्थाने, देवराया, हॉटेल्स, निसर्गाच्या कुशीत असलेले भव्य गृहप्रकल्प यामुळे शहरी पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतात. तसेच पुणे शहराला मुळशी तालुका अधिक जवळ असल्याने तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्याही प्रचंड आहे, परंतु येणाऱ्या पर्यटकांना पुरेशा सोयीसुविधा नसल्याने त्यांची अनेकदा गैरसोय होते. तसेच या ठिकाणी येण्यासाठी येणाऱ्या मुख्य मार्ग व अंतर्गत रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. त्याचा परिणाम पर्यटनवाढीवर होतो.
त्यामुळे तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी डिंभे धरण परिसराप्रमाणे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. याबाबत पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे यांनी बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे व मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना दिले आहे.
कंधारे यांनी दिलेल्या निवेदनात तालुक्यात करावयाची विविध कामे सुचवण्यात आली आहेत.
यामध्ये १) डोंगरवाडी, निवे आणि वांद्रे हद्दीत असलेल्या प्लस व्हॅली परिसरात व्हॅली क्राॅसिंग, राक क्लायबिंगची सुविधा सुरू करावी. २) मुळशी व टेमघर धरणाच्या बॅक वाॅटरमध्ये जलक्रीडा सुविधा उपलब्ध करावी. ३) मुळशी धरणात स्थानिकांना मासेमारीची परवानगी द्यावी व येथे डिंभे धरणाच्या परिसरात शाश्वत संस्थेमार्फत सुरू असलेल्या मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी. ४) ताम्हिणी अभयारण्याच्या परिसरात वन खात्याच्या मदतीने काही पॉइंट ठरवून त्यासाठी निसर्ग भटकंतीची (जंगल ट्रेक) योजना राबविण्यात यावी. उदा. मे महिन्याच्या अखेरीस या परिसरात दिसणारे काजवे पाहण्यासाठी हौशी पर्यटक येतात. धामणओहळ परिसरातील शेकरू अद्याप दुर्लक्षित आहे. ५) पळसे, ताम्हिणी आदी परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी निवासाची शासकीय व्यवस्था करावी, ६) मुळशी धरणाच्या पायथ्याला किंवा धरणाच्या बॅकवाटर परिसरात पैठणच्या धर्तीवर गार्डन तयार करावे. ७) मुळशीतील कोराईगड, तिकोणा, तैलबैला, वडुस्ते येथील किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करावा, ८) मुळा व मुठा नदीवर रिव्हर राफ्टिंगची सोय करावी. ९) मुळशीतील शेरे, पळसे, भालगुडी, ताम्हिणी येथील देवस्थानांना तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा . १०) ) माले येथील मुळशी सत्याग्रहाच्या लढ्याचे संग्रहालय उभारावे
आदी मागण्यांचे निवेदन सुळे यांना देण्यात आले होते.
निसर्गसौंदर्याने नटलेल्या मुळशीत पर्यटन व्यवसायाला खूप मोठी संधी आहे. मुळशी, टेमघर, वरसगाव यांसारखी मोठी धरणे व त्याभोवती असलेली समृद्ध जैवविविधता, ताम्हिणी अभयारण्य, किल्ले, मुळा, मुठा नद्यांचा हिरवागार परिसर यामुळे शहरातील पर्यटक मुळशीकडे नेहमीच आकर्षित होतो. परंतु या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकरिता आवश्यक त्या सुविधा व सुरक्षितता मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होते. तालुक्यातील मुख्य मार्ग व अंतर्गत रस्ते खराब असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या सोयी झाल्या तर त्या माध्यमातून तालुक्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा सदस्य या नात्याने सुप्रिया सुळे व मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे.
- अमित कंधारे, सदस्य, पुणे जिल्हा नियोजन समिती
मुळशीतील पर्यटनवाढीसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण करण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून सूचना आलेल्या आहेत. या सुविधांच्या पूर्ततेकरिता आम्ही प्रशासन स्तरावर नियोजन करत आहोत.
आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद
मुळशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून तिचे जतन व संवर्धन होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या वनसंपदेच्या माध्यमाने पर्यटनवाढीसही चालना मिळायला हवी. त्याकरिता येथील जैवविविधतेला बाधा न येता पर्यटकांना पर्यटनाचा आनंद कसा घेता येईल यासाठी सोयीसुविधा कशा पुरविता येतील याबाबत स्थानिक नागरिकांच्या मागणीचा विचार करून वनखात्याच्या माध्यमाने शासनाकडे प्रस्ताव पाठवले जाणार आहेत.
राहुल पाटील, उपवनसंरक्षक
मुळशी धरण परिसराचे विहंगम दृष्य
मुळशी तालुक्यात पर्यटनासाठी आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देताना पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विवेक वळसे पाटील.