कामगार भविष्य निर्वाह निधीचा अपहार

By Admin | Updated: June 19, 2014 05:25 IST2014-06-19T05:25:56+5:302014-06-19T05:25:56+5:30

येथील औद्योगिक वसाहतीमधील लावा ब्राईट बार्स प्रा. लि. या कंपनीवर कामागरांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली नाही,

Labor futures funds | कामगार भविष्य निर्वाह निधीचा अपहार

कामगार भविष्य निर्वाह निधीचा अपहार

जेजुरी : येथील औद्योगिक वसाहतीमधील लावा ब्राईट बार्स प्रा. लि. या कंपनीवर कामागरांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली नाही, तशी तरतूदही केली नसल्याने निधीचा अपहार केल्याचा ठपका ठेवून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (न्यास) श्रम मंत्रालय पुणे विभागाच्या वतीने जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तशी फिर्याद या विभागाचे निरीक्षक विजय एकनाथ सातपुते यांनी दिली आहे.
याबाबत श्रम मंत्रालय पुणे विभागाचे निरीक्षक विजय सातपुते यांच्याकडून मिळालेली माहिती
अशी, की लावा ब्राईट बार्स या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या भविष्याची तरतूद म्हणून (एम्लॉय प्रॉव्हिडंट फंड आॅर्गनायझेशन)
केंद्र शासनांतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी न्यास (श्रम मंत्रालयाच्या अधीन) कार्यरत आहे. कंपनीने अथवा किमान २० कामगार ठेवणाऱ्या व्यवस्थापनाने दर महिन्याच्या १५ तारखेच्या आत कामगार वेतनातून १२ टक्के रक्कम कपात करून तेवढीच रक्कम न्यासाकडे भरावयाची असते. या कंपनीने १ डिसेंबर २०११ पासून न्यासाकडे ही रक्कम भरण्यासाठी टाळाटाळ केली. सुरुवातीला फक्त १४ कामगारांचे पैसे कंपनीकडून भरण्यात आले होते. त्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह
निधीच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे. या कंपनीकडून कामगारांच्या वेतनातूनही कपात केली नाही. यातून कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांची व भविष्य निधी संघटनेची फसवणूक करण्याचाच उद्देश स्पष्ट होत असल्याने एप्रिल २०१२ ते मार्च २०१३ या कालावधीत सुमारे १ लाख १३ हजार ३७० रुपयांचा अपहार केला असल्याचा ठपका ठेवून कंपनीचे संचालक जवाहरलाल सुजमल डागा (रा. औंध, पुणे) यांच्यावर भादंवि कलम ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विभागीय आयुक्त वैशाली दयाळ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सातपुते यांनी ही कारवाई केली आहे. कामगार भविष्य निर्वाह निधीची व त्याच्या तरतुदीची अंमलबजावणी न करणाऱ्या कंपन्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, जेजुरी औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्या बंद आहेत. त्यामुळे माहिती संकलनात अडचणी येत आहेत, असेही निरीक्षक सातपुते यांनी या वेळी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Labor futures funds