कोरेगाव भीमा प्रकरण: घर जाळल्याप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:03 IST2018-04-26T00:03:14+5:302018-04-26T00:03:14+5:30
येरवड्याला रवानगी : सकट कुटुंबीयांचे जाळले होते घर

कोरेगाव भीमा प्रकरण: घर जाळल्याप्रकरणी दोघांना अटक
पुणे : कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीमुळे जमाव बंदीचा आदेश असतानाही घराची तोडफोड करून ते जाळल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. विशेष न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांनी दोघांचीही रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
विलास श्रीधर वेदपाठक (वय ६०), गणेश विलास वेदपाठक ( वय २४, दोघेही रा. नरेश्वर वस्ती, कोरेगाव भीमा, शिरूर) अशी येरवडा कारागृहात रवानगी केलेल्या दोघांची नावे आहेत. नवनाथ ज्ञानोबा दरेकर, सोमनाथ फक्कडराव दरेकर, गोरक्ष पाटीलबुवा थोरात, गणेश गोरक्ष थोरात, विशाल काळुराम दरेकर (पाचही रा. सणसवाडी) आणि सुभाष गणपत धावटेरा (रा. वाडेगाव फाटा, कोरेगाव भीमा, शिरूर) यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जयदीप सुरेश सकट ( २४, रा. कोरेगाव भीमा) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २ जानेवारी रोजी घडला.
सणसवाडी रास्ता-रोको
सणसवाडी (ता. शिरूर) येथे ग्रामस्थ व महिलेला शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप करीत सणसवाडी ग्रामस्थांनी बुधवारी रास्ता रोको व गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. आत्महत्या केलेल्या पूजा सकट हिचे वडील सुरेश सकट यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
कोरेगाव भीमा जवळील वाडा पुनर्वसन येथे पूजा सकट हिने आत्महत्या केल्यानंतर नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर सकट कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. सकाळी सणसवाडीच्या माजी सरपंच आशा दरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष वैभव यादव, रामभाऊ दरेकर यांच्यासह इतर चार ते पाच जण सणसवाडी चौकात थांबले असताना त्या ठिकाणी मृत पूजाचे वडील सुरेश सकट त्यांना संरक्षणासाठी असलेल्या स्टेनगनवाल्या पोलिसांसह दुचाकीवरून आले. त्यांनतर त्यांनी आशा दरेकर यांना शिवीगाळ केली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. दुपारंनतर जनजीवन सुरळीत झाले.
जामिनावर २ मे रोजी सुनावणी
फिर्यादी सकट कोरेगाव भीमा येथे राहत असताना त्यांचे घर फोडून जाळण्यात आले होते. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यातअॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर दोघांनीही जामीनासाठी न्यायलयात अर्ज दाखल केला असून त्यांच्या जामीनावर २ मे रोजी सुनावणी होणार आहे.