किसनराव बाणखेले माणुसकी जपणारा साधा माणूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:15 IST2021-09-06T04:15:02+5:302021-09-06T04:15:02+5:30
मंचर: माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांनी नेहमी सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपणूक केली. माणुसकी जपणारा हा साधा माणूस होता. ...

किसनराव बाणखेले माणुसकी जपणारा साधा माणूस
मंचर: माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांनी नेहमी सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपणूक केली. माणुसकी जपणारा हा साधा माणूस होता. किसनराव बाणखेले यांच्या स्मारकामुळे त्यांचे स्मरण कायम राहील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
लोकनेते माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा मंचर येथे पवार यांच्या हस्ते पार पडला. या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे होते. या वेळी व्यासपीठावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, आमदार दिलीप मोहिते, आमदार अतुल बेनके, माजी आमदार पोपटराव गावडे, शरद सोनवणे, सत्यशिल शेरकर, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, मथुरानानी बाणखेले, रामदास बाणखेले आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, किसनराव बाणखेले यांनी नेहमी सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपणूक केली. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वेगळे राजकारण असते. सत्तेत असाे अथवा नसाे परस्परांचा आदर करण्याची भूमिका असते. सभागृहात वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी सभागृहाबाहेर एकत्र येतात. दुर्दैवाने मागील काही दिवसांपासून काही ठिकाणी संघर्ष होऊन अतिरेक झाल्याचे पाहावयास मिळते. काही लोकांची विधाने वाचतो ही स्थिती योग्य नाही. लोकशाहीत परस्परांचा सन्मान करणे महत्त्वाचा आहे. व्यक्तिगत आदर ठेवला पाहिजे.सामूहिक हिताच्या प्रश्नासाठी एकत्र आले पाहिजे.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, किसनराव बाणखेले यांनी सर्वसामान्यांसाठी राजकारण करण्याची भूमिका घेतली. पूर्णाकृती पुतळ्याच्या समोर असलेल्या पटांगणात खुले सभागृह बांधण्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे कायमस्वरूपी सभागृह उपलब्ध होईल.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, सभागृहात किसनराव बाणखेले यांना जवळून पाहता व अनुभवता आले. बाणखेले सभागृहात बोलण्यासाठी उभे राहिले की लॉबीतील आमदार सभागृहात येत होते. किसनराव बाणखेले यांचे व्यक्तिमत्त्व चैतन्य निर्माण करणारे होते. त्यांच्या कार्याची माहिती देणारे पुस्तक प्रकाशित व्हावे.
संजय राऊत म्हणाले, किसनराव बाणखेले यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांना हवेहवेसे वाटणारे होते. कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे बाणखेले होते. कष्टकऱ्यांचा लढा येतो तेव्हा बाणखेले यांचे उदाहरण दिले जाते. शरद पवार यांच्या हस्ते बटन दाबून बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. उपसरपंच युवराज बाणखेले यांनी प्रास्ताविक केले. पूजा थिगळे, नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन तर वंदना बाणखेले यांनी आभार मानले.
फोटोखाली: माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले.