किरकटवाडीचे सरपंच करंजावणे यांचे पद धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:16 IST2020-12-05T04:16:01+5:302020-12-05T04:16:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भ्रष्टाचार केल्याचे आरोप प्रथमदर्शनी सिध्द होत असल्याचा सरकारी चौकशी अहवाल आल्यामुळे ...

Kirkatwadi Sarpanch Karanjawane's post in danger | किरकटवाडीचे सरपंच करंजावणे यांचे पद धोक्यात

किरकटवाडीचे सरपंच करंजावणे यांचे पद धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भ्रष्टाचार केल्याचे आरोप प्रथमदर्शनी सिध्द होत असल्याचा सरकारी चौकशी अहवाल आल्यामुळे किरकटवाडीचे सरपंच गोकुळ करंजावणे यांचे सरपंचपद धोक्यात आले आहे.

किरकटवाडीचे सरपंच गोकुळ करंजावणे यांच्यावर तीन प्रकरणांमध्ये स्थानिक रहिवासी हरेश मंडले यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लेखी स्वरूपात केले होते. त्यात प्रथम दर्शनी दोषी आढळल्याने हवेली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांना कारवाई संदर्भात अहवाल सादर केला. त्याला कोहीनकर यांनीही मंजुरी दिली आहे.

आता प्रकरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे गेले आहे. आयुष प्रसाद यांच्या मंजुरीनंतर सरपंच गोकुळ करंजावणे यांचे पद धोक्यात येऊ शकते. असे झाल्यास भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी आढळून जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाचे पद जाण्याची हवेली तालुक्यातील ही पहिलीच घटना ठरणार आहे.

किरकटवाडी येथे विकास कामे करण्यापुर्वी जाहिर निविदा न काढणे, काम झाल्यानंतर इ- निविदा प्रसिध्द करणे, ग्रामपंचायतीच्या ताब्यात जागा नसताना तेथे रस्ते आणि अन्य सार्वजनिक कामे करून अपव्यय करणे, विविध वस्तुंच्या खरेदीत पारदर्शकता न ठेवता सार्वजनिक पैशांची उधळपट्टी करणे अशा स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते.

याबाबत हवेली आणि वेल्हा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर केले आहेत. त्यावर करंजावणे यांना १९ ऑक्टोबर रोजी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली. मात्र मुदतीत खुलासा न आल्याने करंजावणे यांचे सरपंचपद रद्द करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे.

कोट

आरोपात तथ्य

“मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी विभागीय आयुक्तांकडे पुढील कारवाईसाठी निर्देश मागवले आहेत. त्यानंतर सुनावणी होऊन अंतिम कारवाई करण्यात येईल.”

- प्रशांत शिर्के, गट विकास अधिकारी, हवेली.

Web Title: Kirkatwadi Sarpanch Karanjawane's post in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.