आभासी जगात हरवताहेत मुले, ‘ब्लू व्हेल’ने पालक चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:26 IST2017-08-12T02:26:28+5:302017-08-12T02:26:31+5:30
शालेय विद्यार्थ्यांचा थेट शेवट करणाºया ‘ब्लू व्हेल गेम’ची ग्रामीण भागात चांगलीच धास्ती घेतली आहे. आभासी जगात मुले मोबाईलच्या माध्यमातून हरवत असताना त्यांना सावरायचे कसे यामुळे पालक चिंतेत पडले आहेत.

आभासी जगात हरवताहेत मुले, ‘ब्लू व्हेल’ने पालक चिंतेत
बारामती : शालेय विद्यार्थ्यांचा थेट शेवट करणाºया ‘ब्लू व्हेल गेम’ची ग्रामीण भागात चांगलीच धास्ती घेतली आहे. आभासी जगात मुले मोबाईलच्या माध्यमातून हरवत असताना त्यांना सावरायचे कसे यामुळे पालक चिंतेत पडले आहेत.
संवादाचा अभाव असल्याने इंंटरनेट असणारे मोबाईल या मुलांचे विश्व बनले आहे. त्यामुळे गरजेपुरताच मोबाइल वापरण्याची विद्यार्थ्यांना सवय लावावी. विद्यार्थ्यांना मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी सक्तीने वागण्याची वेळ आली आहे, असे मत काही जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
वर्गातील मित्रांच्या माध्यमातून मोबाइल, संगणक गेमची विद्यार्थ्यांना चटक लागते. त्यानंतर ही मुले या गेमचा आनंद लुटण्यासाठी सायबर कॅफे गाठतात. वाय सिटी, कंडिशन झिरो या गेम्सचा सध्या बोलबाला आहे. इंटरनेटचा तुलनेने वापर अधिक वाढला आहे. काही पालक जागरुकतादेखील दाखवत आहेत. इंटरनेटशी संबंधित शाळेचे प्रकल्प तयार करण्यासह विविध कामांसाठी संगणकाची गरज भासते. त्यासाठी पालक सायबर कॅफेमध्ये विद्यार्थ्यांसमवेत येऊन मार्गदर्शकाची भूमिका बजावतानाही दिसत आहेत.
याबाबत येथील स्टार सायबर कॅफेचे सलमान बागवान यांनी सांगितले, की ब्लू व्हेल गेम या परिसरातील विद्यार्थ्यांपर्यंत सुदैवाने पोहचलेला नाही. आम्ही ‘डाउनलोड’ केलेले गेमच मुलांना खेळू देतो. हे गेम खेळण्यासाठी इंटरनेटची गरज नसते. त्यामुळे विनाइंटरनेटचे संगणक विद्यार्थ्यांना उपलब्ध केले जातात. बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक सोबत येतात. अल्पवयीन मुले एकटी आल्यास त्यांना येण्याचे कारण विचारले जाते. अश्लील संकेतस्थळापर्यंत येथील लहान मुले पोहचणार नाहीत याची दक्षता घेतली जाते. युवा वर्गाची सायबर कॅफेमध्ये वर्दळ असल्याचे बागवान यांनी सांगितले.
सायबर क्षेत्रातील व्यावसायिक दत्तात्रय आदलींग यांनी सांगितले, की महाविद्यालयाचे ओळखपत्र पाहूनच येथे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अनेक विद्यार्थी, युवक प्रकल्प, नोकरी अर्ज भरण्यासाठी येतात. तर अनेक जण चित्रपट ‘डाउनलोड’ करण्यासाठी देखील येतात. चित्रपट पाहण्यासाठी येणारा वर्गदेखील मोठा आहे. अश्लील संकेतस्थळ उघडण्यास मनाई आहे. त्यासाठी सायबर कॅफेतील प्रत्येक संगणकावर नजर ठेवण्यात येते. संगणकाचा चांगला आणि शैक्षणिकच वापर होईल, याची दक्षता घेतली जाते.
नकळत होतात चुकीचे संस्कार
सध्या संगणकावर इंटरनेट जोडून कामकाज करताना अनेक अश्लील व्हिडीओ, छायाचित्रे आपोआप समोर येतात. हे ‘टॅग’ केलेले अश्लील व्हिडीओ, छायाचित्र नकळत चुकीचा संदेश देतात.
जणू नकळत या गोष्टींना प्रोत्साहनच दिले जाते. हे अश्लील व्हिडीओ, छायाचित्रे काढून टाकले जाऊ शकत नाही. काम करताना अनेक वेळा हे आपोआप ‘ओपन’ होतात. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. चुकीचे संदेश, संस्कार यामुळे होण्याची शक्यता आहे, असे कॅफेचालक सलमान बागवान यांनी सांगितले.