खरीप वाया; रब्बीसाठी प्रयत्न
By Admin | Updated: September 29, 2015 02:18 IST2015-09-29T02:18:01+5:302015-09-29T02:18:01+5:30
बारामती तालुक्यातील जिरायती भागात मागील आठवड्यातील पावसानंतर रब्बीच्या पेरण्यांना वेग आला आहे. मात्र, बऱ्याच भागातील

खरीप वाया; रब्बीसाठी प्रयत्न
लोणी भापकर : बारामती तालुक्यातील जिरायती भागात मागील आठवड्यातील पावसानंतर रब्बीच्या पेरण्यांना वेग आला आहे. मात्र, बऱ्याच भागातील पाणीसाठे अद्याप कोरडेच आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यातच खरीप वाया गेल्यानंतर रब्बीच्या पेरणीसाठी बी-बियाणे, खते मशागतीसाठी खर्चाची जुळवाजुळव करताना शेतकरीवर्गाला आर्थिक चणचण भासत आहे.
या भागातील एकमेव नगदी पीक असलेला कांदा बी व रोपांचे भाव दुप्पट वाढूनही येथील शेतकरी कांद्याची लागवड किंवा पेरणी मोठ्या प्रमाणात करीत आहे. तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील लोणी भापकर परिसरात यंदाचा संपूर्ण खरीप वाया गेल्यानंतर मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला.
या भागातील खोलीकरण झालेल्या ओढ्या-नाल्यात पाणी साठले आहे. मात्र, शेजारच्या पळशी, तरडोली, बाबुर्डी, माळवाडी परिसरातील ओढे, पाझर तलाव अद्याप कोरडेच आहेत. त्यामुळे काही भागात विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झालेली असली, तरी इतरत्र रब्बी हंगामासाठी मोठ्या पावसाची गरज आहे, असे शेतकरीवर्गातून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मोरगाव ते कऱ्हा वागज या बारामती-पुणे मार्गालगतच्या काळ्यापट्ट्यात रब्बी ज्वारीच्या पेरण्यांना वेग आला आहे. उगवणीनंतर एक मोठा पाऊस झाला, तरी या पट्ट्यातील मालदांडी ज्वारीचे पीक हमखास पदरात पडेल, असे येथील शेतकरी त्रिंबकराव भापकर यांनी सांगितले. या भागात खरीप हंगामात कांद्यासारखे नगदी पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते. मात्र, मागील तीन वर्षांपासून पावसाअभावी या भागात कांद्याचे पीक घेता आलेले नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांकडे बी अथवा कांदारोपे नाहीत. तरीही ज्या भागात पाणीपातळीत वाढ झालेली आहे. तेथे कांद्याची पेरणी जोरात सुरू आहे. मात्र, दोन ते अडीच हजार रुपये किलो दराने कांदा बी, तसेच खतांच्या किमतीत अडीचपट वाढ झाली आहे. तर, कांदा लागणीसाठी अडीचशे ते तीनशे रुपये मजुरी द्यावी लागत असल्याने शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. पेरणीसाठी खर्चाची जुळवाजुळव करताना ओढाताण होत असल्याचे चित्र आहे.