वाघोलीच्या ग्रामसभेत खडाजंगी
By Admin | Updated: August 18, 2015 03:53 IST2015-08-18T03:53:53+5:302015-08-18T03:53:53+5:30
तंटामुक्ती अध्यक्ष, खाण क्रशर बंद करणे आणि गायरान जमिनीवरील अतिक्रमणांमुळे वाघोलीच्या ग्रामसभेत खडाजंगी झाली. तंटामुक्ती समिती बदलण्याची मागणी

वाघोलीच्या ग्रामसभेत खडाजंगी
वाघोली : तंटामुक्ती अध्यक्ष, खाण क्रशर बंद करणे आणि गायरान जमिनीवरील अतिक्रमणांमुळे वाघोलीच्या ग्रामसभेत खडाजंगी झाली. तंटामुक्ती समिती बदलण्याची मागणी झाल्यानंतर पुढील ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष व नवीन समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेली वाघोली ग्रामपंचायतीची ग्रामसभा चांगलीच गाजली. सरपंच संजीवनी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या.
तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांची निवड केली जाणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्यांसह हजेरी लावल्यामुळे अनेक दिवसांनंतर ग्रामसभेला गर्दी झाली. ग्रामविकास अधिकारी दाते यांनी सुरुवातीला विविध योजनांची माहिती देऊन अपंग लाभार्थ्यांचे वाचन
केले.
यानंतर तंटामुक्ती समितीबाबत विषय आल्यानंतर तरुणांनी चालू ग्रामसभेतच अध्यक्षांची निवड करण्याची मागणी केली. शासन निर्णयानुसार पुढील ग्रामसभेत अध्यक्ष निवडला जाईल, असे ग्रामपंचातीच्या वतीने सांगण्यात आले.
मात्र, वाघोली तंटामुक्ती समितीच्या कार्याबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. समितीच्या निवडीवरून सुमारे एक तास ग्रामसभेचे वातावरण संवेदनशील झाले होते.
पर्यावरणाला घातक दगडखाणी बंद करण्यात याव्यात आणि याच खाणींना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा परस्परविरोधी अर्जांचे वाचन या वेळी करण्यात आले. ग्रामस्थांच्या चर्चेनंतर नवीन खाणींना परवानगी देण्यात येणार नसून, जुन्या खाणींना पुढील १५ आॅगस्टपर्यंतच ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे ठरविण्यात आले.
ग्रामसभेत गायरान जमिनींवरील अतिक्रमणाचा मुद्दादेखील चांगलाच गाजला. केसनंद फाटा
येथील अतिक्रमण काढून टाकावे, अशी मागणी प्रामुख्याने होऊ लागली.
सन २०००पूर्वीचे अतिक्रमण काढू नये, अशा शासनाच्या सूचना असून इतर अतिक्रमण ग्रामपंचायत काढेल व नवीन अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे माजी उपसरपंच रामदास दाभाडे यांनी सांगितले. (वार्ताहर)