पुणे : काही गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. राज्यात एकी निर्माण करणे ही जबाबदारी सर्वांची आहे. हा विचार शेवटच्या माणसापर्यंत जाईल तेव्हाच एकी निर्माण होईल. राजकीय विचार वेगळे असतील; पण महाराष्ट्र शांत झाला पाहिजे. हे काम एकट्या मुख्यमंत्र्यांचे नसून, ती जबाबदारी सर्वांची आहे. सर्वांनीच राज्यात सामाजिक सलोखा राखला पाहिजे. त्याकरिता साहित्यिकांची लेखणी उपयुक्त ठरेल, असे मत ज्येष्ठ नेते आणि दिल्ली येथील साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.
निमित्त हाेते, सरहद आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयाेजित साहित्यिकांशी संवाद कार्यक्रमाचे. त्यावेळी पवार बोलत होते. या वेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, मसापचे अध्यक्ष आणि विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, राज्यात एकी निर्माण झाली पाहिजे. परभणी आणि इतर भाग शांत झाला पाहिजे. यासाठी इथे येण्यापूर्वी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली. राजकीय विचार वेगळे असतील पण, महाराष्ट्र शांत झाला पाहिजे. काही दिवसांपासून राज्यात अतिशय अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. येणाऱ्या सर्व संकटांवर मात करण्याची ताकद मराठी माणसात आहे. किल्लारीचा भूकंप, मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या निर्णयावेळी जाती-धर्मात द्वेष पसरला होता. या संकटाच्या काळात मराठी माणसे एकत्र आल्याचे सर्वांनी पाहिले आहे.
दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाने मराठी भाषेचा गौरव होणार आहे. दिल्लीतील लोकांना मराठी साहित्य संमेलनाची उत्सुकता आहे. या संमेलनाबद्दल सर्वांना औत्सुक्य आहे, असेही पवार यांनी नमूद केले.