‘लाइन बॉईज’वर ठेवा लक्ष!
By Admin | Updated: October 29, 2015 00:08 IST2015-10-29T00:08:12+5:302015-10-29T00:08:12+5:30
पोलीस वसाहतींमधील तरुणांवर (लाइन बॉईज) वर विशेष लक्ष ठेवून ते वेगळ्या वाटेवर जाणार नाहीत, याची काळजी घेण्यासोबतच त्यांच्या शिक्षणातील

‘लाइन बॉईज’वर ठेवा लक्ष!
पुणे : पोलीस वसाहतींमधील तरुणांवर (लाइन बॉईज) वर विशेष लक्ष ठेवून ते वेगळ्या वाटेवर जाणार नाहीत, याची काळजी घेण्यासोबतच त्यांच्या शिक्षणातील आणि नोकऱ्यांमधील अडचणी सोडवण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिले आहेत. मुख्यालयाच्या सहायक पोलीस आयुक्तांकडे याची जबाबदारी सोपवण्यात आली असून, सर्व पोलीस पुत्रांची माहिती गोळा केली जाणार आहे. पालकत्वाची भूमिका अधिकाऱ्यांनी बजावावी, अशी अपेक्षा महासंचालकांनी व्यक्त केली.
महासंचालक दीक्षित गेल्या आठवड्यात पुण्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. पुणे शहर पोलिसांच्या शिवाजीनगर मुख्यालयामध्ये घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये दीक्षित यांनी हे आदेश दिले. पोलीस कर्मचारी दिवसरात्र जनतेच्या रक्षणासाठी रस्त्यावर असतात. त्यांना स्वत:च्या कुटुंबाकडे आणि मुलांकडेही लक्ष द्यायला वेळ नसतो. अनेकदा मुलांचे शिक्षण, त्यांचे करिअर याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मुलांचे जीवन सुकर होण्याऐवजी दुष्कर होत जाते.
दोन वर्षांपूर्वी ‘लाईन बॉय’ कुणाल पोळ याचा त्याचाच एकेकाळचा साथीदार असलेल्या जंगळ्या उर्फ विशाल शाम सातपुते याने साथीदारांच्या मदतीने खून केला होता. स्वारगेट पोलीस वसाहतीमध्ये वाढलेला कुणाल अल्पावधीतच शहराच्या गुन्हेगारी वर्तुळात नावारूपाला आला होता. कुणालच्या खुनाच्या तपासादरम्यान त्याचाच एकेकाळचा जवळचा मित्र असलेल्या अजय अनिल शिंदे याचा संबंध असल्याच्या संशयावरून कुणालच्या साथीदारांनी शिंदेवर ११ मार्च २०१५ रोजी गोळीबार केला होता. सुदैवाने शिंदे बचावला, परंतु त्याच्या मैत्रिणीला गोळी लागली होती. शिंदे हासुद्धा पोलिसाचाच मुलगा आहे. गुन्हेगारांना धडक भरवणाऱ्या खाकी वर्दीचा धाक त्यांच्याच मुलांना राहिलेला नाही.
‘लाइन बॉईज’च्या एकंदरीत जीवनाविषयी तत्कालीन पोलीस आयुक्त सतीश माथुर, सह आयुक्त संजय यांनी गांभीर्य दाखवले होते. त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ज्या पोलिसांची मुले गुन्हेगारी क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत त्यांची जंत्री तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. असंगाशी संग केल्यामुळे या मुलांचे भवितव्य अंधकारमय होत चालले आहे. त्यामुळे या मुलांचे आयुष्य वेगळ्या वाटेकडे जाऊ नये याकरिता ठोस पावले उचलण्याच्या सुचना या बैठकीमध्ये महासंचालकांनी दिले. सर्वच पोलिसांची मुले गुन्हेगारीकडे आकर्षित होताहेत हे म्हणणे चुकीचे ठरेल. अनेक पोलिसांनी आपल्या कर्तव्याला जागत कुटुंबाकडेही पुर्ण लक्ष दिलेले आहे. मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण दिलेले आहे. अनेक पोलिसांची मुले मुले परदेशी गेल्याचीही उदाहरणे आहेत.