बालसाहित्याचा ठेवा!
By Admin | Updated: May 9, 2017 04:11 IST2017-05-09T04:11:52+5:302017-05-09T04:11:52+5:30
महाराष्ट्रातल्या बालवाचक चळवळीला दिशा देणारे व सध्याच्या मूल्यसंक्रमणाच्या काळात परंपरा, नावीन्य यांचा सांधा जोडणारा

बालसाहित्याचा ठेवा!
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्रातल्या बालवाचक चळवळीला दिशा देणारे व सध्याच्या मूल्यसंक्रमणाच्या काळात परंपरा, नावीन्य यांचा सांधा जोडणारा ‘अक्षर बालवाङ््मय’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील सुमारे ३२ पुस्तकांचे काम पूर्ण झाले असून, हा साहित्यठेवा लवकरच बालवाचक, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. नाशिकमधील डॉ. मंगला वरखेडे यांच्याकडे समन्वयक म्हणूनजबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पाच ते सोळा वर्षांच्या मराठी भाषिक मुलांना वयोगटानुसार सकस वाचनसाहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अक्षर बालवाङ््मय प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पहिल्या भागात मराठीतील गेल्या दोनशे वर्षांतील बालसाहित्याच्या निवडक पुस्तकांची वर्णनात्मक सूची वयोगटानुसार व विषयानुसार तयार करण्यात आली आहे. वयोगटानुसार मुलांना कोणती पुस्तके वाचायला द्यावीत, याचे नियोजन करण्याकरिता शिक्षक, पालकांना या मार्गदर्शक स्वरूपाच्या वर्णनात्मक सूचीचा उपयोग होईल, अशी माहिती साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी दिली.
महाराष्ट्राच्या मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा विविध प्रादेशिक लोकसंस्कृतीतील निवडक मौखिक बालसाहित्य संपादित केले जाईल. ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या पाठ्यपुस्तकनिर्मिती मंडळांनी सिद्ध केलेले निवडक बालसाहित्य, गेल्या दोनशे वर्षांत आधुनिक मराठी बालसाहित्यातील वाचनसंस्कृतीवर प्रभाव टाकणाऱ्या लोकप्रिय व प्रायोगिक बालसाहित्याचे निवडक संपादन निवडक बालसाहित्याची मराठी भाषांतर, मध्ययुगीन व आधुनिक कालखंडातील गाजलेल्या बालसाहित्यकृतींचे मराठी अनुवाद आदींचा यात समावेश आहे.