कातकरी करणार उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST2021-01-13T04:26:09+5:302021-01-13T04:26:09+5:30
कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे धरणाचे काम पूर्ण होऊन ३५ वर्षे झाली. या धरणात आंबेगाव हे गाव गेल्यामुळे आंबेगावचे ...

कातकरी करणार उपोषण
कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे धरणाचे काम पूर्ण होऊन ३५ वर्षे झाली. या धरणात आंबेगाव हे गाव गेल्यामुळे आंबेगावचे पुनर्वसन तालुक्यालगत घोडेगाव, चास, कडेवाडी, चिंचोली आदी ठिकाणी करण्यात आले. यातूनही उरलेल्या आदिम जमातीमधील कातकरी समाजाच्या कुटुंबांसाठी सन २०१० मध्ये बोरघर गावाजवळील उरलेल्या शिल्लक क्षेत्राच्या हद्दीमध्ये आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने विशेष निधी खर्च करून २६ घरकुले बांधुन दिली. परंतु हे उर्वरित शिल्लक क्षेत्र कोणत्याच ग्रामपंचायतीला न जोडल्यामुळे घरकुलांची नोंद अजूनही होऊ शकली नाही. त्यामुळे या २६ कुटुंबांना कोणत्याही नागरी सुविधा मिळत नाही. या घरकुलांची नोंद व्हावी म्हणून ११ नोव्हेंबर २०१६ रोजी कातकरी समाज कुटुंबांतील १५६ लहानमोठया व्यक्तींनी डिंभे धरणामध्ये जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला. १५ नोव्हेंबर २०१६ रोजी तहसीलदार आंबेगाव व गटविकास अधिकारी यांनी जुने आंबेगावचे बुडीत क्षेत्र वगळून महसुली गाव बोरघर ग्रामपंचायतीस जोडणेबाबतचा प्रस्ताव तयार करून गटविकास अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांचेकडे देतील. त्यानंतर बोरघर ग्रामपंचायतीमध्ये समावेश करण्याचा आदेश प्राप्त झाल्यानंतर घरांच्या नोंदी केल्या जातील, असे लेखी आश्वासन दिल्याने कातकरी समाजाने जलसमाधी आंदोलन स्थगित केले. या सर्वांचा परिणाम म्हणून पंचायत समिती आंबेगाव यांनी परिपूर्ण प्रस्ताव पुणे जिल्हा परिषद यांना पाठवला व पुणे जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव मान्य करून आवश्यक त्या ठरावासह विभागीय आयुक्त पुणे यांना २७ नोव्हेंबर २०१७ रोजी सादर केला व विभागीय आयुक्त कार्यालयाने २० डिसेंबर २०१७ रोजी सदरील प्रस्ताव मान्यतेसाठी सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांना पाठवला होता. यानंतर मात्र या प्रस्तावावर आजपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर हा प्रश्न २६ जानेवारीपर्यंत तत्काळ सोडविण्यात यावा व बुडीत आंबेगाव येथील शिल्लक क्षेत्र ग्रामपंचायत बोरघरला जोडण्यात यावे, अन्यथा २६ जानेवारीपासून स्थानिक ग्रामस्थ व किसान सभेचे कार्यकर्ते बेमुदत उपोषण करणार असल्याचे किसानसभा आंबेगाव तालुका समिती अध्यक्ष कृष्णा वडेकर, उपाध्यक्ष राजू घोडे व सचिव अशोक पेकारी यांनी ग्रामविकास विभागाचे सचिव व विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे.