पश्चिम घाटात काजव्यांचे तारांगण

By Admin | Updated: June 17, 2014 02:44 IST2014-06-17T02:44:56+5:302014-06-17T02:44:56+5:30

शहरांतील कृत्रिम झगमगाटापासून कोसो दूर घनदाट जंगलातील झाडे रात्री चमकत आहेत. मिणमिणणारे हे ‘नैसर्गिक दिवे’ पाहताना डोळे दीपून जात आहेत

Kajavis Varajangan in the Western Ghats | पश्चिम घाटात काजव्यांचे तारांगण

पश्चिम घाटात काजव्यांचे तारांगण

नीलेश काण्णव , घोडेगाव (पुणे)
शहरांतील कृत्रिम झगमगाटापासून कोसो दूर घनदाट जंगलातील झाडे रात्री चमकत आहेत. मिणमिणणारे हे ‘नैसर्गिक दिवे’ पाहताना डोळे दीपून जात आहेत. आभाळातून जणू तारांगणच उतरल्याची अनुभूती पश्चिम घाटातील भीमाशंकर अभयारण्यात येत आहे. झाडांवरील काजव्यांच्या या संमेलनामुळे ही अतिशय दुर्मीळ आणि स्वर्गीय अनुभूती येत आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी काजवे माद्यांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारे चमकतात. इमारतींवर सोडलेल्या लाईटच्या माळा जशा चमकतात, तसे हे हजारो काजवे लुकलुकताना लक्ष वेधून घेतात. लुकलुकणाऱ्या काजव्यांनी बहरलेले झाड पाहताना आपसुक ‘ख्रिसमस ट्री’ची आठवण येते.
अशा प्रकारे काजवे चमकणे म्हणजे चांगले नैसर्गिक वातावरण असल्याचे निदर्शक असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ सांगतात. मनुष्यवस्तीपासून दूर आणि माणसांचा हस्तक्षेप नसणाऱ्या भागातच अशा प्रकारचे दृश्य सहसा पाहायला मिळते. सध्या या कीटकांचा प्रजननाचा कालावधी आहे.
त्यामुळे माद्यांना मिलनासाठी आकर्षित करण्यासाठी नर काजवे चमचम करतात. यातूनच आकर्षक नराची निवड करून माद्या मिलनास तयार होतात आणि हे नैसर्गिक ‘तारांगण’ हळूहळू लोप पावते. हे अनोखो दृश्य पाहण्यासाठी पर्यावरणप्रेमींची पावले याठिकाणी वळत आहेत.

Web Title: Kajavis Varajangan in the Western Ghats