पुणे : सध्या वैद्यकीय विज्ञानात अतिशय वेगाने प्रगती होत आहे. त्याला एआयची जोड मिळाल्याने निदान अधिक अचूक होत आहे. त्यामुळे सध्या रक्ताच्या एकाच थेंबातून संबंधित व्यक्तीच्या संपूर्ण शरीराच्या व्याधींचे निदान करणे शक्य होणार आहे, याचे संशोधन गिरिराज चंडक करीत आहेत. त्यांनी विकसित केलेली ‘सिकल सेल स्क्रीनिंग’ यासारखी साधने ही एकाच थेंबातून नेमके, जलद आणि स्वस्त निदान लवकरच करतील. अशा संशोधनासाठी सीएसआयआर (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद)च्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे, अशी माहिती डॉ. एन. कलैसेल्वी यांनी दिली.
सीएसआयआर ही देशातील वैज्ञानिक संशोधन, औद्योगिक औद्योगिक विकासासाठी संशोधन, उत्पादने आणि पेटंट्स या विषयांवर कार्य करणारी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधीन असलेली एक अग्रगण्य संस्था आहे. त्याच्या प्रमुख डॉ. एन. कलैसेल्वी एमआयटीच्या एका परिषदेसाठी पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सीएसआयआरअंतर्गत सुरू असलेल्या भारतातील विविध संशोधनांविषयी माहिती दिली.त्या म्हणाल्या की, गिरिराज चंडक यांचे सिकल सेल स्क्रीनिंग संशोधन विकसित झाल्यावर भारतातील नागरिकांना केवळे ७० ते १०० रुपयांमध्ये रक्ताच्या सर्व चाचण्या एकाच थेंबातून करणे शक्य होणार आहे. त्यामुळे रोगाचे निदान कमी खर्चात आणि कमी वेळेत होणार आहे, हे संशोधन म्हणजे एक क्रांती असेल.
ई-व्हेइकलपेक्षा स्वस्त हायड्रोजन गॅस इंधन लवकरच
पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि बॅटरीपेक्षा शक्तिशाली इंधन म्हणून हायड्रोजन गॅस वाहनांसाठी वापरण्याचा प्रयोग भारतात यशस्वी झाला आहे; परंतु या ग्रीन हायड्रोजन गॅसची निर्मिती सध्या भारतात होत नसल्याने हा गॅस प्रति किलो दोन डॉलर इतका महाग आहे. मात्र, नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनअंतर्गत या हायड्रोजन गॅसची निर्मिती भारतात करणे शक्य असून, येत्या पाच वर्षांत सामान्य नागरिकांना चारचाकी, तीनचाकी वाहनांत भरण्यासाठी हे इंधन उपलब्ध होऊ शकेल. जहाज, विमान आणि रस्त्यावरील अवजड वाहनांसाठी हे इंधन अतिशय स्वस्त आणि महत्त्वाचे ठरणार आहे. वाहनांसाठी या गॅसच्या वापरानंतर त्याचे पाण्याच्या स्वरूपात उत्सर्जन होते. त्यामुळे प्रदूषणही होत नाही, अशी माहिती डॉ. एन. कलैसेल्वी यांनी दिली.