जुन्नरला भूकरमापकासह एकावर गुन्हा
By Admin | Updated: July 4, 2017 03:16 IST2017-07-04T03:16:38+5:302017-07-04T03:16:38+5:30
जुन्नर भूमीअभिलेख कार्यालयातील भूकरमापक याला हाताशी धरून ओतूर (ता. जुन्नर) येथील एका मिळकतीस वारस असताना

जुन्नरला भूकरमापकासह एकावर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
जुन्नर : जुन्नर भूमीअभिलेख कार्यालयातील भूकरमापक याला हाताशी धरून ओतूर (ता. जुन्नर) येथील एका मिळकतीस वारस असताना कोणीही वारस नाही, असे भासवून या मिळकतीची फाळणी बारा करून बोगस कागदपत्रे तयार करून बोगस सह्या करून फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या फिर्यादीनंतर जुन्नर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यमाजी देवकर खरात (रा. ओतूर, ता. जुन्नर) व एन. यू. कराळे, भूकरमापक (रा. जुन्नर) या दोघांविरुद्ध प्रतिभा हरिश्चंद्र खरात (रा. वरळी, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पद्मभूषण गायकवाड, पोलीस हवालदार अमोल गायकवाड करीत आहे. प्रतिभा खरात यांच्या कुटुंबाची ओतूर येथे वडिलोपार्जित मिळकत जमीन असून त्यात अनेक खातेदार आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ, बहीण यांची वारस म्हणून सातबारावर नोंद झाली असून बहीण भावाच्या मालकीची ८८ गुंठे जमीन तसेच गिरजाबाई खरात (मृत) यांचीही या मिळकतीमध्ये मालकीची जमीन आहे. असे असताना यमाजी देवकर खरात यांनी जुन्नर भूमीअभिलेख कार्यालयातील भूकरमापक यांना हाताशी धरून या जमिनीची फाळणी बारा करण्यासाठी या कार्यालयात अर्ज केला होता.
या वेळी कोणीही नातेवाईक हजर नसताना ते स्वत: जमिनीचा फाळणी बारा करण्यासाठी समक्ष हजर राहून त्यांनी त्यास संमती दिली आहे, असे खोटे प्रतिज्ञापत्र तयार केले. तसेच काकु गिरजाबाई यांना कोणी वारस नाही, असे सांगून केलेली फाळणी बारा आम्हास मान्य आहे, असे सांगितले.
तसेच भाऊ-बहिणीच्या नावापुढे खोट्या बनावट सह्या करून फसवणूक केली असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर केलेल्या तक्रारीनंतर या दोघांवर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.