जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे पुण्यात अधिवेशन; माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा येणार
By राजू इनामदार | Updated: January 30, 2025 16:24 IST2025-01-30T16:22:42+5:302025-01-30T16:24:20+5:30
अधिवेशनात महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाची भूमिका ठरविण्यात येणार

जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे पुण्यात अधिवेशन; माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा येणार
पुणे: आणीबाणीनंतरच्या (१९७७) सार्वत्रिक निवडणुकीत देशाची सत्ता जनता पक्षाला मिळाली. ती तीनच वर्षांत संपुष्टात आली. त्यानंतर पक्षाचे शकले झाली. त्यातल्याच जनता दल (धर्मनिरपेक्ष) या गटाला पुन्हा एकदा पंतप्रधानपद मिळाले. या माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा अध्यक्ष असलेल्या पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन २१ फेब्रुवारीला पुण्यात होत आहे.
भारतीय जनता पक्ष प्रणीत केंद्र सरकारमध्ये हा पक्ष घटक पक्ष आहे. त्यांच्याकडे केंद्रीय अवजड उद्योग व स्टील खात्याचे मंत्रिपद आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्यासह हे केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी, कर्नाटकचे माजी कृषिमंत्री बंडप्पा काशेमपुर हेही पुण्यातील अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे राज्यातील अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे आहेत. त्यांनी ही माहिती दिली. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी ११ वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होईल.
अधिवेशनात महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाची भूमिका ठरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पक्षाची संघटनात्मक बांधणी, त्यासाठी घ्यावयाचे शेतकरी पेन्शन, वाढती महागाई, वीज दरवाढ, बेरोजगारी, वाढता कर्जबाजारीपणा आदी प्रश्नांबाबत चर्चा करून आंदोलन उभे करण्याच्या दृष्टीने विचार होणार आहे, असे शेवाळे यांनी सांगितले.