राजगुरूनगर : खेड तालुक्यातील गावातील नागरिकांना त्याच्या घरात नळाने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने हर घर जल योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातर्फे निविदा प्रक्रिया राबवून ही कामे पूर्ण केली जात आहे. परंतु ही योजना दीर्घकालीन तसेच मोठ्या निधीची असल्याने योजनेचा काही गावात या योजनाचा बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र दिसत आहे. खेड तालुक्यात एकूण १५८ कामे जलजीवनची कामे मंजुर झाली आहे. त्यापैकी ७३ कामे पूर्ण, ८५ कामे प्रगतीपथावर असून रोहकल, वाकळवाडी येथील योजनेचे काम रखडले आहे. पाच कोटी पेक्षा जास्त निधीच्या २१ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनाचे काम सुरु आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ते पुर्ण करणार आहेत. मार्च २०२४ पासून जलजीवन मिशनच्या निधीची उपलब्ध नसल्यामुळे उर्वरित कामे केव्हा होईल असा प्रश्न नागरिकांना पडला असला तरी काही गावात योजना पूर्ण असल्याचे दाखवूनही नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.मंजुर नळपाणीपुरवठा योजनाची गावे व कंसात अंदाजपत्रकीय रक्कम पुढीलप्रमाणे ढोरे भांबुरवाडी-जरेवाडी (१ कोटी २८ लाख), खरपुडी खुर्द (५३ लाख ३५ हजार), गाडकवाडी (६५ लाख १३ हजार), कान्हेवाडी बु. (१ कोटी ३२ लाख ७ हजार), माजंरेवाडी (६४ लाख ३२ हजार), सांडभोर वाडी (१ कोटी १० लाख ७५ हजार), राक्षेवाडी (९८ लाख २२ हजार), बहुळ (१ कोटी ९८ लाख ९८ हजार), तळ्याची ठाकरवाडी-दोंदे (१ कोटी ९९ लाख ९९ हजार), चिखलगाव (५७ लाख ६७ हजार), साबळेवाडी (५९ लाख ३२ हजार), वाळद (१ कोटी १५ लाख ३६ हजार), गोसासी (१ कोटी ६३ लाख ८४ हजार), करंजविहिरे (६३ लाख ९४ हजार), गुळाणी (१ कोटी ४९ लाख ९८ हजार), कोये (३ कोटी २ लाख ५ हजार), पापळवाडी (६६ लाख ४१ हजार), वडगाव पाटोळे (१ कोटी ६२ लाख), बहिरवाडी (९१ लाख ३२ हजार), गोनवडी (२१ लाख ३७ हजार), भिवेगाव-भोरगिरी (२० लाख ७ हजार), साबुर्डी (१ कोटी २८ लाख ४२ हजार) आणि खालुंब्रे (४ कोटी १० लाख २७ हजार).खेड तालुक्यातील पाच कोटीहुन अधिक अंदाजपत्रक रक्कमेच्या नळपाणीपुरवठा योजना या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या अखत्यारित आल्या आहे.त्या २१ गावांची नावे पुढीलप्रमाणे निमगाव खंडोबा, दावडी, वरुडे, वाफगाव, कनेरसर, पुर, चिचंबाईवाडी, वाकळवाडी, जऊळके बु., निघोजे, म्हाळुंगे, खराबवाडी, काळुस, रासे, मरकळ, सोळु, च-होली खु., गोलेगाव, पाईट, कडुस आणि किवळे या गावापैकी पुर्व भागातील वरुडे वाफगाव परिसरातील विविध गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चासकमान धरणातुन कडुस सह ३१ गावांची नळपाणीपुरवठा योजना युती सरकारच्या काळात १९९७ साली मंजुर झाली. चार पाच वर्षात योजना टप्याटप्याने कार्यान्वित केली. मात्र अनेक गावांनी पाणीपट्टी भरलीच नाही. दोन कोटीहुन अधिक वीजबिलाची रक्कम थकली आणि दोन वर्षात ही योजना बंद पडली. ती पुन्हा सुरु झाली नाही. पुन्हा गेल्या युतीच्या काळात याच पुर्व भागातील वाफगाव गुळाणी ते कनेरसर भागातील विविध गावातुन ओढा, नदी खोलीकरण, बंधारे बांधण्यावर कृषी सह विविध विभागानी कामे केली. दुर्दैवाने आजही उन्हाळ्यात या परीसरातील गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.
वाकळवाडी, रोहकल या गावात विहिरीला जागा उपलब्ध नसल्यामुळे येथील योजना रखडली आहेत. काही गावात योजनेला वीज कनेक्शन मिळाले नाही. तसेच गेल्या आठ महिन्यापासून निधी मिळत नसल्यामुळे ठेकेदार कामास चालढकल करीत असल्यामुळे योजना रखडल्या आहेत. - कालिका खरात (शाखा अभियंता ग्रामिण पाणी पुरवठा ,उपविभाग खेड)