"बाळासाहेब शिवाजी पार्कवरुन शरद पवारांवर टीका करायचे यातच गम्मत"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 14:18 IST2022-09-20T14:16:21+5:302022-09-20T14:18:08+5:30
महाविकास आघाडी सरकारध्ये अजित पवार पालकमंत्री असताना पुण्यात दर आठवड्यात आढावा बैठक व्हायची.

"बाळासाहेब शिवाजी पार्कवरुन शरद पवारांवर टीका करायचे यातच गम्मत"
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) य़ांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सातत्याने निशाणा साधत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे. "माय-बाप जनतेला वाऱ्यावर सोडणं कितपत योग्य याचं आत्मचिंतन ओरबाडून आलेल्या खोके सरकारने करावं" असं म्हणत हल्लाबोल केला होता. आता दसरा मेळाव्यातील वादावरुनही शिंदे गटाला टोला लगावला आहे.
महाविकास आघाडी सरकारध्ये अजित पवार पालकमंत्री असताना पुण्यात दर आठवड्यात आढावा बैठक व्हायची. पण, आता सत्ताधारी तसं काहीच करत नाहीत. त्यामुळे विकासकामं पेंडिंग राहताहेत. तसेच 23 गावातील कचरा आणि पाणी समस्या अजूनही तशीच आहे. प्रशासक आणि शहाराला पालकमंत्री नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. म्हणूनच खासदार या नात्याने पुणे मनपा आयुक्तांची भेट घेऊन या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना सरकारवर आणि शिंदे गटावर टिकाही केली.
दसरा मेळाव्यातील शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील वादावरुन सुळे यांनी टिका केली. आम्ही जेव्हा शिवसेनेच्या विरोधात होतो, तेव्हा शिवसेनेच्या बाबतीत असं कधीही केले नाही. शिवसेनेचा भव्य मेळावा व्हायचा. आम्हीही तो उत्सुकतेनं पहायचो. आमच्यावरती काय टिका करतात याची आम्हाला उत्सुकता असायची. बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवरुन शरद पवारांवर टीका करायचे यातच तर गम्मत आहे. विरोधक हा दिलदार असायला हवा. नाहीतर राजकारण आणि समाजकारण करायला मज्जा कशी येणार, असा प्रतिसवाल विचारत सुप्रिया सुळेंनी एकप्रकारे शिंदे गटावर निशाणा साधला.