भोसलेंच्या बंडखोरीची गंभीर दखल
By Admin | Updated: February 5, 2017 03:48 IST2017-02-05T03:48:21+5:302017-02-05T03:48:21+5:30
आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांनी केलेल्या बंडखोरीची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली आहे. येत्या दोन दिवसांत अजित पवार याबाबत

भोसलेंच्या बंडखोरीची गंभीर दखल
पुणे : ‘आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांनी केलेल्या बंडखोरीची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली आहे. येत्या दोन दिवसांत अजित पवार याबाबत जाहीरपणे बोलतील,’ असे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले. कारवाईचा निर्णयही तेच घेतील, असे त्या म्हणाल्या.
भोसले यांना पक्षाने दोन वेळा विधान परिषदेची उमेदवारी दिली. महापालिकेतही अनेक पदे दिली. या वेळी प्रभागात कार्यकर्त्याला उमेदवारी देऊ, तुम्ही थांबा असे अजित पवार यांनी सांगितले होते, मात्र त्यांनी ऐकले नाही. उमेदवारी मिळाली नाही हे समजल्यावर लगेचच पक्षाशी बंडखोरी केली. कार्यकर्त्यांमध्ये राग आहे, असे चव्हाण म्हणाल्या.
पक्षाने अन्य प्रभागांमध्ये नातेवाईकांमध्ये उमेदवारी दिली आहे, असे निदर्शनास आणले असता चव्हाण म्हणाल्या, ‘‘काही वेळा असे निर्णय घ्यावे लागतात. पण उमेदवारी मिळाली नाही, म्हणून कोणी पक्षाच्या विरोधात जात नाही. अनेक कार्यकर्ते असे आहेत, की त्यांनी उमेदवारी मिळाली नाही तरी पक्षाचे निष्ठापूर्वक काम करणार असल्याचे भेट घेऊन सांगितले. योग्य भूमिका असेल तर पक्ष लक्षात ठेवतो. चुकीची भूमिका घेतली तर त्याचा धडा कधी ना कधी तरी मिळतोच.’’
निवडणूक अधिकारी पक्षपातीपणाने काम करीत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. (प्रतिनिधी)
भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्न
राज्य सरकारने निवडणूक भाजपाच्या फायद्याची कशी होईल, त्यासाठी चार सदस्यांचा एक प्रभाग करण्यापासून अनेक बदल निवडणूक प्रक्रियेत केले आहेत. निरक्षर व गरिबातील गरीब व्यक्तीलासुद्धा निवडणूक लढविता यावी, असे घटनेतच स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे, मात्र आॅनलाईन अर्ज सक्तीचा करून त्याला हरताळ फासण्यात आला, अशी टीका चव्हाण यांनी केली.
४राज्य सरकारने विकास आराखडा इंग्रजीत जाहीर केला. राजकीय पक्ष निवडणुकीत गुंतलेले असतील, त्यामुळे भूखंडांवरील आरक्षण उठवण्यासह सर्व गडबडी गुप्त राहतील, अशा हेतूनेच राज्य सरकारने ही खेळी केली असल्याचा आरोप वंदना चव्हाण यांनी केला. आराखडा मराठीत जाहीर करावा व हरकतीसाठी निवडणुकीनंतर महिन्याची मुदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची क्लिपिंग्ज नाकारली गेली. हे सगळे चुकीचे व राज्य सरकारच्या आदेशाने चालले आहे, राष्ट्रवादीला टार्गेट केले जात आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला.