रसिकांमध्ये चित्रसाक्षरता रुजायला हवी
By Admin | Updated: March 19, 2015 00:27 IST2015-03-19T00:27:43+5:302015-03-19T00:27:43+5:30
महाराष्ट्रात साहित्याबरोबर संगीत संस्कृती रुजली आहे. आज संगीताच्या अनेक मैफिली होतात, त्यावर चर्चा घडतात, समीक्षणही लिहिले जाते.

रसिकांमध्ये चित्रसाक्षरता रुजायला हवी
पुणे : महाराष्ट्रात साहित्याबरोबर संगीत संस्कृती रुजली आहे. आज संगीताच्या अनेक मैफिली होतात, त्यावर चर्चा घडतात, समीक्षणही लिहिले जाते. मात्र, चित्रकलेला अजूनही गांभिर्यतेने घेतले जात नाही. चित्रसाक्षरता अजूनही आपल्याकडे कमी आहे, असे मत ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी बुधवारी व्यक्त केले.
सुरेश लोटलीकर यांनी साकारलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षांच्या अर्कचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस होते प्रमुख पाहुणे म्हणून एमआयटीचे संस्थापक प्रकाश जोशी, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, विजय पराडकर, प्रकाश जोशी, बाळासाहेब गांजवे, सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार उपस्थित होते. सरस्वती लायब्ररी व साहित्यवेध प्रतिष्ठान पुणेच्या वतीने हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आले आहे. आपल्यात चित्रसाक्षरता नसल्याचे मत शि. द. फडणीस यांनी व्यक्त केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन, तर शरद मांडे यांनी आभार मानले. हे प्रदर्शन १९, २० मार्च या कालावधीत सकाळी १०.३० ते सायंकाळी ८ पर्यंत खुले राहणार आहे. (प्रतिनिधी)
४संमेलनाला रिकामटेकड्यांचा उद्योग म्हणणाऱ्या ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी घुमानच्या संमेलनाला येण्यास नकार दर्शविला आहे. पण या प्रदर्शनात ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांच्या अर्कचित्रांचे विशेष दालन ठेवण्यात आले आहे, त्यात नेमाडे यांच्याही अर्कचित्राचा समावेश आहे, त्यावर भाष्य करताना आम्ही नेमाडे यांना संमेलनाला घेऊन जात आहोत, पण ते अर्कचित्राच्या माध्यमातून! अशी खोचक टिप्पणी साहित्य सुनील महाजन यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
अर्कचित्रांची वारी घुमानला...
४पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात माजी-संमेलनाध्यक्षांची अर्कचित्रं प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याची माहिती कैलास भिंगारे यांनी दिली. यामध्ये साहित्य महामंडळ व संमेलन संयोजन समितीने सहकार्याची भूमिका पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.