दुचाकी चोरणारी आंतर जिल्हा टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:16 IST2021-05-05T04:16:18+5:302021-05-05T04:16:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : बारामती शहर पोलिसांनी दुचाकी चोरणारी आंतर जिल्हा टोळी गजाआड केली आहे. या ...

दुचाकी चोरणारी आंतर जिल्हा टोळी गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : बारामती शहर पोलिसांनी दुचाकी चोरणारी आंतर जिल्हा टोळी गजाआड केली आहे. या टोळीकडून २० लाख रुपये किमतीच्या १८ दुचाकी मिळविल्या आहेत. या सर्व दुचाकी जप्त केल्या आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी योगेश विलास चिरमे (वय २३, रा. झारगडवाडी, ता. बारामती) याच्यासह त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. शहर व परिसरातून दुचाकीचोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे दुचाकीचोरी उघडकीस आणण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिवन देशमुख, अप्पर अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सपोनि प्रकाश वाघमारे, सहाय्यक फौजदार शिवाजी निकम, दशरथ इंगोले, तुषार चव्हाण, अकबर शेख, बंडू कोठे, अजित राऊत, सायबर शाखेचे सपोनि मोहिते, तेचन पाटील, गोपाळ ओमासे यांचे पथक तयार केले. या पथकाने तातडीने तपास सुरू केला. या वेळी ३० मार्च रोजी पहाटे ३.३० वाजता प्रथमेश अपार्टमेंट, दत्तनगर, कसबा येथून पल्सर चोरीला गेली होती. येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पोलिसांनी पाहणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चिरमे याचे नाव पुढे आले. त्याचा शोध घेत त्याच्यासह दोघा अल्पवयीन मुलांना सापळा रचून अटक केली. त्यांची पोलीस कोठडी घेत अधिक चौकशी केली असता त्यांनी शहर, तालुका, फलटण, सासवड, दौंड आदी ठिकाणाहून १८ दुचाकी चोरल्याचे समोर आले. या दुचाकी त्यांनी गजानन दत्तू चव्हाण, नीलेश ऊर्फ सोन्या चिलम ऊर्फ उदय मोहन शोवगन यांना विकल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
छायाचित्र : बारामती शहर पोलिसांनी दुचाकी चोरणारी आंतर जिल्हा टोळी जेरबंद केली आहे.
०४०५२०२१ बारामती—०१