पुणे : पुण्यात सार्वजनिक उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये “डीजेवर बंदी घालावी” या मागणीसाठी कलावंत ढोल ताशा पथकाच्या कलाकारांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेतून गोळा करण्यात येणाऱ्या स्वाक्षऱ्या व निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द केले जाणार असल्याची माहिती अभिनेते सौरभ गोखले यांनी दिली होती. त्यानंतर आता साऊंड अँड इलेक्ट्रिकल्स जनरेटर असोसिएशन या मोहिमेविरोधात आवाज उठवला आहे. काही कलाकार आणि मंडळांनी डीजेमुक्त गणेशोत्सवाची भूमिका घेतली आहे. मात्र, यामुळे आमचा उदरनिर्वाह धोक्यात येत असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमजानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांतील मिरवणुका, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त शोभायात्रांमध्ये डीजे/डॉल्बी व तत्सम मोठ्या ध्वनीप्रणालींना सक्त मनाई करावी. अशा आवाजामुळे स्थानिक रहिवाश्यांना होणारा त्रास, शारीरिक हानी (जसे की बहिरेपणा) तसेच वाहतूक कोंडीस आळा घालावा. मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्य व कलाप्रकारांना प्रोत्साहन द्यावे. ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र नियमावली तयार करावी. या मागण्या कलावंत ढोल पथकाकडून करण्यात आल्या होत्या. त्यावरून साऊंड असोसिएशनने नाराजी दर्शवली आहे.
गणेशोत्सवात डीजे व्यावसायिकांना सेवा देणे ही अभिमानाची बाब मानली जाते. मात्र, काही उपनगरांतील तसेच राज्याबाहेरील डीजे व्यावसायिक नियम धाब्यावर बसवून प्रचंड आवाजाचे साऊंड वापरत असल्यामुळे, नियमांचे काटेकोर पालन करणारे व्यावसायिक अन्यायाला सामोरे जात आहेत. त्यामुळे प्रशासनाने याबाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ध्वनिप्रदूषणावरील नियम सर्वासाठी समानपणे लागू करावेत, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
आमचा उदरनिर्वाह धोक्यात येतो
"गेल्या अनेक वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत असलेले आमचे व्यावसायिक नाहक बदनाम होत आहेत. काही बेकायदेशीर व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी सर्वांनाच दोषी ठरवले जाते. आम्ही स्वतः कर्णकर्कश्श डीजेविरोधात असून, नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना अन्याय होऊ नये, यासाठी वेळोवेळी प्रशासनाला निवेदने दिली आहेत. ढोल-ताशा पथकांवर आणि डीजेवर वेगळे नियम लादण्याऐवजी एकसमान नियम असले पाहिजेत. काही कलाकार आणि मंडळांनी डीजेमुक्त गणेशोत्सवाची भूमिका घेतली आहे. मात्र, यामुळे आमचा उदरनिर्वाह धोक्यात येतो.