वयाच्या सत्तरीतील सायकलवीर, निरुपमा भावे यांचा प्रेरणादायी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:00 IST2017-11-20T00:00:35+5:302017-11-20T00:00:49+5:30
पुणे : सिंहगड रस्त्यावर सिंहगड, पानशेतकडे जाणारे हौशी सायकलस्वार रविवारी दिसतात.

वयाच्या सत्तरीतील सायकलवीर, निरुपमा भावे यांचा प्रेरणादायी प्रवास
विश्वास खोड
पुणे : सिंहगड रस्त्यावर सिंहगड, पानशेतकडे जाणारे हौशी सायकलस्वार रविवारी दिसतात. कुमारवयीन मुले, तरुण त्यात असतात. आज एका महिलेनं डेक्कन ते पानशेत आणि परतीच्या मार्गावर असताना व्हाया बावधन ते डेक्कन असा प्रवास सायकलवर केला. सकाळी साडेसहा ते दुपारी साडेबारादरम्यान तब्बल १०० किलोमीटरचं अंतर रेसर सायकलवर कापलं. निरुपमा श्रीकृष्ण भावे असं त्यांचं नाव. सध्या वय वर्षे सत्तर.
निरुपमा भावे आणि त्यांचे सहकारी रविवारी शहराच्या मध्यवर्ती भागापासून दूर अंतरावर सायकलवर जातात. भावे यांचा वाढदिवस ३ जानेवारीला कन्याकुमारी येथे सायकलवर जाऊन साजरा केला जाणार आहे. १९ डिसेंबरपासून ९ जण सायकलवर हा प्रवास करणार आहेत. त्यामध्ये ६ महिला आणि ३ पुरुष आहेत. एकाच घरातल्या शीला परळीकर, अनघा परळीकर या मायलेकी आणि कविता जोशी या सूनबाई, सुनीता नाडगीर (वय ७०), जयंत देवधर (वय ६५), अजित अभ्यंकर (वय ६०) आणि चंद्रशेखर आणि श्यामला हे दांपत्य आणि निरुपमा भावे असा सायकलप्रेमींचा एक गट आहे. महिन्यातील पहिल्या रविवारी पुण्यातील सायकलप्रेमींचा एक गट सायकलवर दूरवरची सफर करतो. त्यात ही मंडळी आहेत.
निरुपमा भावे पुणे विद्यापीठात गणित विभागाच्या प्रमुख होत्या. त्यांचे पती श्रीकृष्ण भावे वाडिया महाविद्यालयात प्राध्यापक होते. श्रीकृष्ण भावे यांचे एक
सहकारी सायकल वापराचे महत्त्व नेहमी सांगत. वयाच्या पन्नाशीनंतर निरुपमा भावे यांनी सायकल चालविणे सुरू केले. तेव्हापासून त्या रोज ४ ते ५ किलोमीटर प्रवास सायकलवर करतात.
>तब्येत फिट राहते
निरुपमा भावे म्हणाल्या, सायकल चालविल्याने तब्येत फिट राहते. सध्या ताशी
१८ किलोमीटरपर्यंत सायकलचा वेग राखण्याएवढी प्रगती झाली आहे. माझा वाढदिवस कन्याकुमारीला सायकलवर जाऊन करणार आहोत. त्यासाठीचा सराव म्हणून आज पानशेतपर्यंतचा प्रवास के ला गेला.
- निरुपमा भावे