गर्भवती मृत्यू प्रकरणी चौकशी समितीची पिडीत कुटुंबाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST2021-01-13T04:26:35+5:302021-01-13T04:26:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळेघर :-आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील फलोदे येथील गर्भवती महिला व बाळाच्या झालेल्या मृत्यु प्रकरणी ...

गर्भवती मृत्यू प्रकरणी चौकशी समितीची पिडीत कुटुंबाला भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेघर :-आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील फलोदे येथील गर्भवती महिला व बाळाच्या झालेल्या मृत्यु प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने सोमवारी (दि ११) पिडीत कुटुंबांच्या घरी जात चौकशी करुन माहिती घेतली. या घटनेचा वस्तुनिष्ठ अहवाल शुक्रवारी (दि १५) जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना देणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अशोक नांदापुरकर यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम दुर्गम भागातील फलोदे या गावातील पुनम दत्तात्रय लव्हाळे या गर्भवती महिलेला वेळेत उपचार तसेच रूग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू झाला होता. या बाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या घटनेची सखोत तपासणी करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करत अहवाल देण्याचे आदेश दिले होते. या समितीत जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.अशोक नांदापुरकर,जिल्हा कार्यक्रम अधिकारी दत्तात्रय मुंढे, प्रकल्प अधिकारी आर.बी. पंडुरे, वैद्यकिय अधिकारी डाॅ.अमितकुमार पाटील तालुका अरोग्य अधिकारी डाॅ. सुरेश ढेकळे यांनी भेट देवुन चौकशी केली.
चौकशी समितीने पिडीत कुटुंबियांच्या घरी जावुन पती दत्तात्रय लव्हाळे, दीर शंकर लव्हाळे, थोरली जाऊ गंगुबाई लव्हाळे, यांच्याशी चर्चा केली. तसेच संपुर्ण घटनाक्रम समजुन घेतला. त्यानंतर तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जावुन घटना घडलेल्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची उलट फेर चौकशी केली. त्यांनतर घोडेगाव ग्रामिण रुग्णालयामध्ये जावुन त्यांनी चौकशी केली.
चौकट—
फलोदे येथील गर्भवती महिला व तीच्या बाळाच्या मृत्यु प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीने पिडीत महिलेच्या घरी जावुन कुटुंबियांशी चर्चा केली. तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्र, घोडेगाव ग्रामिण रुग्णालय, मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय, येथील खाजगी डाॅक्टर, यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी पुणे येथे जावुन समिती चौकशी करणार आहे. याचा तपास पुर्ण करुन शुक्रवार पर्यंत चौकशी अहवाल आम्ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे देणार आहोत. घडलेली घटना अतिशय दुदैवी असुन भविष्यात असे घडु नये याची काळजी आम्ही घेवु असे डाॅ. अशोक नांदापुरकर यांनी सांगितले.
फोटो :-फलोदे (ता. आंबेगाव) येथील पिडीत कुटुंबियांशी चर्चा करताना जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अशोक नांदापुरकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दत्तात्रय मुंढे, प्रकल्प अधिकारी आर.बी. पंडुरे,वैद्यकिय अधिकारी डाॅ.अमितकुमार पाटील तालुका अरोग्य अधिकारी डाॅ. सुरेश ढेकळे.