पुणे: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुणेकरांनामहागाईचा फटका बसला आहे. पुण्यातील लॉन्ड्री व्यावसायिक संघाने लॉन्ड्री सेवा दरांमध्ये वाढ जाहीर केली आहे. वाढती महागाई, वीज दरवाढ आणि इतर मूलभूत खर्चामुळे जुन्या दरांवर सेवा देणे अशक्य झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेच्या बैठकीत या निर्णयाला सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली आहे.
लॉन्ड्री व्यवसायामध्ये वीज, पाणी, केमिकल्स आणि मनुष्यबळाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या दरात सेवा पुरवणे परवडणारे नसल्यामुळे संघटनेने हा निर्णय घेतला असून ग्राहकांच्या हिताचा विचार केला आहे. दरवाढ आवश्यक असूनही ती किमान पातळीवर ठेवण्यात आली आहे. २०२१ साली शेवटची दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना महामारीच्या काळात आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीत, ग्राहकांवरील आर्थिक ताण लक्षात घेऊन लॉन्ड्री व्यावसायिक संघाने कोणतीही दरवाढ केली नव्हती. मात्र, आता वाढत्या महागाईमुळे व्यवसाय टिकवून ठेवणे कठीण झाले असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार, नवीन दर बुधवारी दि.१ जानेवारी २०२५ पासून लागू करण्यात आले आहेत.
जुने दर : निवडणुकीच्या आधीचे
प्रत्येकी १ नग इस्त्री कपडा : १० /-प्रत्येकी १ नग धुलाई कपडा : ५० ते ६०/-
नवीन दर
प्रत्येकी १ नग इस्त्री कपडा : १५ /-प्रत्येकी १ नग धुलाई कपडा : ८०/-
महागाई आणि वीज दरवाढीमुळे व्यवसायावर मोठा ताण आला आहे. जुन्या दरात सेवा देणे परवडत नसल्याने आम्हाला दरवाढ करावी लागली. मात्र, ग्राहकांच्या सोयीचा विचार करून दरवाढ मर्यादित ठेवली आहे.’ - राहुल राक्षे, सचिव, लॉन्ड्री व्यावसायिक संघ.