केंद्र सरकारने नाणारमध्ये यावे, मग कळेल जनता कशी ठोकरते : सुभाष देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 19:59 IST2018-06-27T19:51:13+5:302018-06-27T19:59:43+5:30
नाणारवासीयांचा विरोध असताना केंद्र सरकार जर नाणार येथे प्रकल्प करू इच्छित असेल तर त्यांनी शिवसेनेशी बोलण्याची गरज नाही. त्याऐवजी त्यांनी नाणार येथील नागरिकांशी बोलावे, मग जनता कशी ठोकरते हे त्यांना कळेल अशा शब्दात सुभाष देसाई यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने नाणारमध्ये यावे, मग कळेल जनता कशी ठोकरते : सुभाष देसाई
पुणे : नाणारवासीयांचा विरोध असताना केंद्र सरकार जर नाणार येथे प्रकल्प करू इच्छित असेल तर त्यांनी शिवसेनेशी बोलण्याची गरज नाही. त्याऐवजी त्यांनी नाणार येथील नागरिकांशी बोलावे, मग जनता कशी ठोकरते हे त्यांना कळेल अशा शब्दात सुभाष देसाई यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नाणार येथे होणाऱ्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. शिवसेनेने या स्थानिक नागरिकांना पाठिंबा दिला आहे. मात्र केंद्र सरकारने या संबंधी गेल्या महिन्यात महिन्यात सौदी अरेबिया आणि या महिन्यात अबुदाबीच्या कंपनीसोबत करार केला आहे. अर्थात यामुळे शिवसेना दुखावली असून त्यांनी केंद्राच्या या कृतीबद्दल नाराजी दर्शवली आहे. नवीन औद्योगिक धोरण निश्चित करण्यासाठी उद्योग विभागामार्फत विविध क्षेत्रातील उद्योजकांशी संवाद साधण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्येागमंत्री देसाई यांनी आज येथे उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, परदेशी कंपन्यांसोबत करार करण्यात करताना शिवसेनेला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. जर उद्योग महाराष्ट्रात येणार असतील महाराष्ट्राच्या उद्योग विभागाला, महाराष्ट्र शासनाला कळवणे गरजेचे होते.शिवसेनेला अंधारात ठेऊन हा प्रकल्प करण्याचा प्रयत्न असेल तर हा प्रकल्प होणार नाही.नाणार येथील दहाही ग्रामपंचायतींनी हा प्रकल्प होऊ नये असा ठराव केला आहे याची आठवणही त्यांनी करून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा केंद्रात शिवसेनेच्या मंत्री असलेले अनंत गीते यांनाही कराराच्यावेळी बोलावले नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारने शिवसेनेसोबत बोलण्यापेक्षा नाणारच्या जनतेशी बोलावे. मग जनता कशी ठोकरून काढेल हे त्यांना समजेल असा टोलाही त्यांनी लगावला.