पुणे: भारत भक्कम आहे. मुंबई हल्ल्यातील आरोपी कसाबला फासावर लटकवले. पहेलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनाही सोडणार नाही अशी प्रतिक्रिया या हल्ल्यासंदर्भात व्यक्त होत आहे. पक्षीय मतभेद विसरत सर्वच नेत्यांनी केंद्र सरकारने ठोस कारवाई करावी अशी मागणी करत त्यांना धडा शिकवावाच लागेल असे मत व्यक्त केले.
हा हल्ला गंभीर आहे. केंद्र सरकारने त्याची त्वरीत दखल घेतली आहे. पुण्यात अडकलेल्यांना तिथून आणण्यासाठी आम्ही स्वतंत्र व्यवस्था करत आहोत. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील पर्यटकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री
हा भ्याड हल्ला आहे. भारताच्या सामर्थ्यात, जगातील नावलौकिकात सातत्याने वाढ होत असल्याने शत्रू राष्ट्र भयभीत झाले आहे. त्यामुळे अशा भ्याड हल्ल्याचे नियोजन केले जाते, मात्र भारत अशा भ्याड हल्ल्यांनी मागे हटणारा देश नाही. यात मृत्यूमूखी पडलेल्यांना केंद्र सरकार नक्की न्याय देईल. दहशतवाद्यांवर, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई होईल.- माधुरी मिसाळ, नगरविकास राज्यमंत्री
ही घटना अतिशय दु:खद, संतापजनक व दुर्दैवी आहे. या हल्ल्याचा निषेध. मृत्यूमूखी पडलेल्या सर्वांना श्रद्धांजली. तिथे अडकलेले सर्व पर्यटक सुखरूप आपापल्या घरी यावेत. केंद्र सरकारने हल्ल्याचा कसोशीने तपास करावा.- सुप्रिया सुळे, खासदार,
काश्मिरमध्ये सतत अशांतता असावी, अस्वस्थता असावी या हेतूने वारंवार असे हल्ले करण्यात येतात. वास्तविक अशा हल्ल्यांचे संकेत गुप्तवार्ता विभागाला मिळायला हवेत. पर्यटनाचा हंगाम सुरू असताना तिथे सुरक्षेची कडेकोट व्यवस्था असायला हवी होती. तशी ती नव्हती. हल्ल्याचा तपास व्हावा यासाठी काँग्रेस कायमच केंद्र सरकारच्या बरोबर असेल- मोहन जोशी- प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस
या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. काश्मिरमध्ये शांतता रहावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात व तरीही तिथे अशा घटना घडतातच, हा फक्त सध्याच्या केंद्र सरकारचा अनुभव नाही तर याआधीच्या सरकारांनाही असाच अनुभव आला आहे. केंद्राने एकदा देशातील जनतेला, म्हणजे विरोधी पक्षांना विश्वासात घेत काश्मिर या विषयावर चर्चा करायला हवी.- मुकुंद किर्दत, राज्य प्रवक्ते, आम आदमी पार्टी
हा फक्त पर्यटकांवरील हल्ला नाही तर मानवतेवरील हल्ला आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. हल्ल्याचा मास्टरमाईंड शोधून त्याच्यावर त्वरीत कारवाई करायला हवी. हल्ल्याची जबाबदारी स्विकारणाऱ्या पाकिस्तामधील संघटनांची पाळेमुळे केंद्र सरकारने शोधावीत व कारवाई करावी.- शमसुद्दीन तांबोळी, अध्यक्ष, मुस्लिम सत्यशोधक मंडळ
देशातील निरपराध नागरिकांना अशा हल्ल्यांमधून ठार मारले जात असताना विरोधी पक्षांसह देशातील सर्व जनता कारवाईच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या पाठीशी असेल असा मला विश्वास आहे.सरकारने या हल्ल्याची खोलवर चौकशी करावी व सत्य काय आहे ते जनतेसमोर मांडावे.- सूनील माने- राज्य प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
ज्याने कोणी हे कृत्य केले त्यांना त्याची शिक्षा मिळायला हवी. अशा घटनेचे देशात कोणीही राजकारण करणार नाही. केंद्र सरकारने तातडीने याचा शोध घ्यावा. सध्या आपले म्हणजे देशातील जनतेचे पहिले काम हे आहे की हल्ल्यात मुृत्यूमूखी पडलेल्या २६ जणांच्या कुटुंबांना आधार द्यायचा. तो आपण देऊयात- अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या