पाणीटंचाई विरोधात इंदापूरकर एकवटले!
By Admin | Updated: May 24, 2014 05:09 IST2014-05-24T05:09:04+5:302014-05-24T05:09:04+5:30
नगरपरिषदेला पाणीपुरवठा करण्यात अपयश आल्याने ओढावलेली पाणी टंचाई, भ्रष्टाचाराची कथीत प्रकरणे यामुळे हैराण झालेल्या इंदापूरकरांनी जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

पाणीटंचाई विरोधात इंदापूरकर एकवटले!
इंदापूर : नगरपरिषदेला पाणीपुरवठा करण्यात अपयश आल्याने ओढावलेली पाणी टंचाई, भ्रष्टाचाराची कथीत प्रकरणे यामुळे हैराण झालेल्या इंदापूरकरांनी जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. एकवीस जणांची संघर्ष समिती तयार करण्यात आली आहे. तिच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या कारभाराविरोधात संघर्ष करण्यात येणार आहे. अमर गाडे, पोपट शिंदे, संदिपान कडवळे, राजू ताटे, रमेश शिंदे, दत्तात्रय पवार, सचिन शिंदे, भावेश ओसवाल, विजय शिंदे, अफसर मोमीन, संतोष जामदार, कोरबूचाचा यासह इतरांचा या संघर्ष समितीत समावेश आहे. संघर्ष समितीची भूमिका स्पष्ट करताना अमर गाडे, पोपट शिंदे म्हणाले, सत्तारुढ गट व विरोधक एकत्र येऊन सार्वत्रिक निवडणुका लढवितात. येथेही त्यांनी सामान्य नागरिकांचे शोषण चालविले आहे. प्रसंगी दागिने गहाण ठेऊन, कर्जाऊ, उसने पैसे काढून लोक नगरपरिषदेची देणी देत असतात. इथे मात्र चित्र उलटे आहे. ६0 व ४0 टक्क्यात सारीच कामे सुरु आहेत. नगरपरिषदेच्या विकास आराखड्यात ४, ६, १0 गुंठे अशा आकारातील सामान्यांच्या जागा आरक्षित करण्यात आला. त्याच्यावरती आरक्षणे मागणी करुन देखील हटविली जात नाहीत. गबरगंड पदाधिकारी मात्र सत्तेच्या जोरावर आपल्या जागांवरील आरक्षणे उठवित आहेत. त्यांचा उठविण्याचा प्रयत्न सुरु आहे. या सार्यांची नावे जाहीर करावीत, अशी भूमिका आहे. सर्व मुद्यांवर पारदर्शी कारवाई व्हावी, यासाठी आंदोलन उभारण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.(वार्ताहर)