कोरोनाबरोबरच कोविड संलग्न म्युकरमायकोसिसचा वाढता धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:12+5:302021-05-15T04:09:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाचे संकट दूर होण्याचे नाव घेत नसतानाच जिल्ह्यात कोविड संलग्न म्युकरमायकोसिसचा धोका देखील मोठ्या ...

कोरोनाबरोबरच कोविड संलग्न म्युकरमायकोसिसचा वाढता धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाचे संकट दूर होण्याचे नाव घेत नसतानाच जिल्ह्यात कोविड संलग्न म्युकरमायकोसिसचा धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आतापर्यंत या नव्या रोगाचे २६८ रुग्ण सापडले असून १३ रुग्णांचा मृत्युदेखील झाला आहे, तर ९९ रुग्णांवर यशस्वी शस्रक्रिया केली आहे. कोरोना सोबतच आता या नवीन आजाराकडे देखील तेवढ्याच गांभिर्याने लक्ष द्या, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत प्रशासकीय यंत्रणेला दिल्या.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बहुतेक सर्वच आरोग्य यंत्रणेकडून स्टेरॉइडचा अनियंत्रित वापर केला. मधुमेह असलेले रुग्ण, आयसीयूमध्ये दाखल रुग्ण, ऑक्सिजनचा जास्तीचा वापर व Tocilizumab आणि Itilozumab या सारख्या प्रतिकार शक्तीवर परिणाम करणाऱ्या औषधांचा कोरोना रुग्णांवर केल्याने हा नवीन म्युकरमायकोसिसचा आजार होण्याची शक्यता वाढत आहे. यात कोरोना झालेल्या व मधुमेह, किडनी आणि यकृताचे आजर असलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका अधिक आहे.
याबाबत शुक्रवार (दि.१४) रोजी कोरोना आढाव बैठकीत चर्चा केली. यासाठी आवश्यक असलेली औषधे व इंजेक्शन्स देखील त्वरित उपलब्ध व्हावित म्हणून प्रशासनाने लक्ष घालण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या. तसेच यासाठी टास्क फोर्सच्या आदेशानुसार उपाययोजना करण्याचे आदेश देखील दिले.
------
म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यातील रुग्णांची आकडेवारी
क्षेत्र म्युकरमायकोसिसचे रुग्ण मृत्यू
पुणे मनपा १६८ ०१
पिंपरी-चिंचवड ५२ १०
ग्रामीण ०४ ०२
ससून ४४ ००
एकूण २६८ १३