महिलांच्या आत्महत्यांमध्ये होतेय वाढ
By Admin | Updated: August 18, 2015 03:51 IST2015-08-18T03:51:21+5:302015-08-18T03:51:21+5:30
सुशिक्षित आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यात विवाहित महिलांचा हुंड्यासाठी तसेच पैशासाठी मोठ्या प्रमाणात छळ होत असल्याचे दिसून आले आहे

महिलांच्या आत्महत्यांमध्ये होतेय वाढ
निनाद देशमुख, पुणे
सुशिक्षित आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यात विवाहित महिलांचा हुंड्यासाठी तसेच पैशासाठी मोठ्या प्रमाणात छळ होत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात पाच वर्षांच्या काळात जवळपास ३८० महिलांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.
हुंड्यासाठी सुनेला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. केवळ ग्रामीण भागातच नाही, तर शहरी भागातही या प्रकारात वाढ होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात बारामती तालुक्यातील एका उच्च शिक्षित तसेच प्राध्यापक असलेल्या धनश्री दिवेकर या विवाहितेने स्वत:ला पेटवून घेतले होते. ही घटना ताजी असतानाच शिरूर येथील माधुरी सुतार हिने सासू-सासरे आपल्या चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक त्रास देत असल्यामुळे अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले होते. स्वातंत्र्यदिनी जयश्री ढमढेरे या विवाहितेनेही सासरच्या जाचाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली.
लग्न संमारंभातील मोठेपणामुळे तसेच सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली आजही मोठ्या प्रमाणात हुंडा घेतला जातो, तसेच दिलाही जातो. याला विरोध होत नसल्याने दिवसेंदिवस ही समस्या उग्र होत चालली आहे. काही ठिकाणी पैशाच्या हव्यासापोटी हुंडा देऊनही जास्त पैशाची मागणी होत आहे. यात सुशिक्षित नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. जिल्ह्यात २०१०मध्ये हुंडा मागितल्यामुळे ८ महिलांनी आत्महत्या केली, तर सासरच्या छळाला कंटाळून ७४ महिलांनी आपले जीवन संपवले. याव्यतिरिक्त जवळापास १७५ महिलांनी आपल्या सासरच्या तसेच पतीविरोधात तक्रारी नोंदवल्या होत्या. २०११मध्येही हुंड्याच्या मागणीमुळे ८, तर जाचाला कंटाळून ७९ महिलांनी आत्महत्या केल्या. २०१२मध्ये ८६, २०१३ मध्ये ६१, २०१४ मध्ये ५६ तर २०१५ मध्ये ६ विवाहितांना त्रासामुळे आत्महत्या करावी लागली. या पाच वर्षांत पैशाची मागणी तसेच त्रास होत असल्याच्या जवळपास १,११० तक्रारीची नोंद पोलिसांकडे
झाली आहे.