अॅम्फोटेरोसीन-बीची निर्मिती वाढवावी, वितरणाची सोय करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:11 IST2021-05-13T04:11:47+5:302021-05-13T04:11:47+5:30
पुणे : कोरोनाचा संसर्ग झाल्यावर रुग्णांमध्ये आता म्युकरमायकोसिसचे निदान होऊ लागले आहे. यालाच काळ्या बुरशीचा संसर्गजन्य आजार असे म्हटले ...

अॅम्फोटेरोसीन-बीची निर्मिती वाढवावी, वितरणाची सोय करा
पुणे : कोरोनाचा संसर्ग झाल्यावर रुग्णांमध्ये आता म्युकरमायकोसिसचे निदान होऊ लागले आहे. यालाच काळ्या बुरशीचा संसर्गजन्य आजार असे म्हटले जात आहे. म्युकरमायकोसिसची उपचारपद्धती अत्यंत महागडी असते. यामध्ये अॅम्फोटेरोसीन-बी हे औषध वापरले जाते. या औषधाची निर्मिती वाढवावी आणि योग्य वितरण व्यवस्था लावावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे शासनाकडे केली आहे.
हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील म्हणाले, म्युकरमायकोसिसच्या उपचारात अॅम्फोटेरोसीन-बी या इंजेक्शनचा वापर केला जातो. त्याची ५० मिलिग्रॅमची एक व्हायल २५०० ते ३००० रुपयांना पडते. अंदाजे ७० किलोग्रॅम वजन असलेल्या व्यक्तीला दिवसाला पाच ते सहा व्हायलची गरज भासते. याचा अर्थ इंजेक्शनचा दिवसाचा खर्च २० ते २५ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ही उपचार पद्धती पंधरा दिवसांपर्यंत चालते. म्हणजेच हा खर्च पाच लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. बुरशीचा संसर्गजन्य आजार मेंदूपर्यंत जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र ही उपचार पद्धती सर्वसामान्य माणसाला परवडणारी नाही. त्यामुळेच शासनाने या इंजेक्शनचा दरावर नियंत्रण आणावे, वितरण व्यवस्थेला परवानगी द्यावी आणि निर्मिती वाढवण्याबाबत औषध कंपन्यांना सूचना द्याव्यात.
म्युकरमायकोसिससाठी पॉझोपोनेझॉल या गोळ्यांचाही वापर केला जातो. एका गोळीची किंमत सहा हजार रुपये इतकी आहे. किमान पन्नास हजार रुपये या औषधासाठी खर्च होतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
म्युकरमायकोसिसचे उपचार महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत दिले जातील, असे दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले. मात्र ही योजना लागू असलेली राज्यात केवळ १००० रुग्णालये आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये या आजाराचा उपचार करणारे डॉक्टर आणि यंत्रणा उपलब्ध असेलच असे नाही. सर्व खाजगी दवाखान्यांना इंजेक्शन दिली जाईल, असेही जाहीर केले होते. ही सूचनाही लवकर अमलात यावी, अशी मागणी आयएमएतर्फे केली आहे.
----
कधी वापरले जाते अॅम्फोटेरोसीन-बी?
त्वचारोग, एखाद्या शस्त्रक्रियेतील गुंतागुंत, फुप्फुसांचा संसर्ग, फंगल न्यूमोनिया अशा वेळी फंगस अर्थात बुरशीचा शरीरात प्रादुर्भाव होऊ शकतो. या सर्व प्रकारच्या उपचार पद्धतींमध्ये अॅम्फोटेरोसीन-बी हे प्रभावी औषध मानले जाते. कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी रेमडेसिविर हे पूर्णपणे प्रभावी ठरत नसले तरी लक्षणे कमी करण्यासाठी हे इंजेक्शन उपयुक्त असल्याचे लक्षात आल्याने मागणी अचानक वाढली आणि आणि तुटवडा निर्माण झाला. भविष्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढल्यास अॅम्फोटेरोसीन-बीचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि मनमानी दर आकारले जाऊ नयेत यासाठी शासनाने आत्तापासून दर नियंत्रित करावेत, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.