मार्चएंडमुळे कर्जाच्या वसुलीला चढला जोर
By Admin | Updated: March 29, 2017 00:24 IST2017-03-29T00:24:27+5:302017-03-29T00:24:27+5:30
मार्चएंडमुळे वीजबिल, बँकांचे हप्ते वसुलीला जोर आला असून, कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यामुळे

मार्चएंडमुळे कर्जाच्या वसुलीला चढला जोर
टाकळी हाजी : मार्चएंडमुळे वीजबिल, बँकांचे हप्ते वसुलीला जोर आला असून, कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यामुळे हप्त्याबरोबरच मुला-मुलींचे लग्न कसे करायचे आणि कर्जाचे हप्ते फेडायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
गेल्यावर्षी दुष्काळ परिस्थिती व शेतमालाला न मिळालेला बाजारभाव यामुळे कर्जात गेलेल्या शेतकऱ्याने मोठ्या उमेदीने कर्ज काढून कांदा लागवड केली.
नोटाबंदीमुळे तीन महिने भाजीपाल्याचे भाव मातीमोल झाले होते. गेल्या वर्षीचा कांदा अजून तसाच कांदाचाळीत आहे. आता सध्या कांदा काढणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र, बाजारभाव ४ ते ५ रुपये किलोच मिळत आहे. त्यामधून कांद्याचा उत्पादन खर्चसुद्धा मिळत नाही; परंतु बँकांचा तगादा, वीजबिल वसुली यामुळे मातीमोल भावाने शेतकरी कांदा विकत आहे. भाजीपाल्याचे पैसे झाले नाहीत. कांद्याचे नाही, मग कर्ज फेडायचे कसे, असा सवाल शेतकरीवर्गातून व्यक्त केला जात आहे.
सलग दोन वर्षे शेतकरी बाजारभाव नसल्यामुळे आर्थिक संकटात आला असून, शेती करण्यापेक्षा पडीक ठेवलेली बरी अशी प्रतिक्रिया शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे. जिल्हा बँकांचे पीक कर्जाचे हप्तेही वेळेत नाही फेडले तर २ टक्के व्याजमाफीला तेथेही शेतकरी मुकणार आहे. (वार्ताहर)
कांद्यासाठी नाफेड
सुरू करावे : गावडे
शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी नाफेड सुरू करून १० रुपये किलोने कांदा खरेदी करावा, त्यामुळे पुणे, नगर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना या कांदा उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान खर्च, कर्ज देणे तसेच मुलामुलींचं लग्नकार्य तरी करणे शक्य होईल, अशी मागणी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली आहे.