मिळकत कराची ६०० कोटींची थकबाकी

By Admin | Updated: May 24, 2014 05:03 IST2014-05-24T05:03:53+5:302014-05-24T05:03:53+5:30

उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक झाल्याने महापालिकेचे अंदाजपत्रक डगमगले आहे

Income tax dues of 600 crores | मिळकत कराची ६०० कोटींची थकबाकी

मिळकत कराची ६०० कोटींची थकबाकी

पुणे : उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक झाल्याने महापालिकेचे अंदाजपत्रक डगमगले आहे. त्यामुळे या वर्षी महापालिकेला जादा उत्पन्नाची आवश्यकता असतानाच मिळकत कर विभागाची थकबाकी ६०० कोटींच्या घरात पोहोचली आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी पुढील वर्षभर थकबाकीदारांच्या दारात वसुलीसाठी बँड वाजविण्यात येणार आहे. तसेच, मिळकतीचा वापर सुरू करूनही अद्याप एक दमडीही कर न भरणार्‍या करबुडव्यांसाठी प्रत्येक तीन महिन्यांनी सर्च मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती मिळकत कर संकलन विभागाचे प्रमुख हेमंत निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरात सुमारे पावणेआठ लाख मिळकती आहेत. या मिळकतींना मिळकत कराची बिले वाटप करण्यात आली आहेत. ३१ मेपूर्वी कर जमा करणार्‍या नागरिकांना २५ हजार रुपयांपर्यंत ५ टक्के, तसेच त्यापुढील रकमेवर १० टक्के करसवलत देण्यात येते. दोन महिन्यांपासून या सवलतीचा लाभ लाखो मिळकतधारकांनी घेऊन महापालिकेच्या तिजोरीत तब्बल २९० कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. मात्र, दुसरीकडे मिळकत कराच्या थकबाकीची रक्कमही दर वर्षी वाढतच आहे. ही थकबाकी या वर्षी सुमारे ६०० कोटींच्या घरात गेली आहे. मागील वर्षापासून महापालिकेने थकबाकीदारांच्या वसुलीसाठी त्यांच्या दारात बँड वाजविण्याचा उपक्रम सुरू केला होता. त्यामुळे अवघ्या ६ महिन्यांत सुमारे ९० कोटी रुपयांची वसुली झाली होती. त्यामुळे यंदा १ जूनपासूनच ही बँड पथके कार्यरत करण्यात येणार असल्याचे निकम यांनी सांगितले. तसेच, या वर्षीच्या अंदाजपत्रकात मिळकत कर विभागाला सुमारे ७६० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट याही वर्षी विभागाकडून पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Income tax dues of 600 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.