आयुक्तांच्या विशेषाधिकारात मिळकतकरात सवलत
By Admin | Updated: January 9, 2017 03:16 IST2017-01-09T03:16:04+5:302017-01-09T03:16:04+5:30
मिळकतकर आॅनलाइन भरल्यास त्या रकमेवर ५ टक्के सवलत देण्याचा आयुक्तांनी मांडलेला प्रस्ताव मुख्य सभेने मार्च २०१७ पर्यंत पुढे ढकलला होता.

आयुक्तांच्या विशेषाधिकारात मिळकतकरात सवलत
पुणे : मिळकतकर आॅनलाइन भरल्यास त्या रकमेवर ५ टक्के सवलत देण्याचा आयुक्तांनी मांडलेला प्रस्ताव मुख्य सभेने मार्च २०१७ पर्यंत पुढे ढकलला होता. मात्र आयुक्तांनी त्यांच्या विशेषाधिकाराचा वापर करून ३१ मार्च २०१७ पर्यंत आॅनलाइन मिळकतकराची रक्कम भरणाऱ्यांना ५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ११ जानेवारीपासून पुणेकरांना ही सवलत उपलब्ध होणार आहे.
नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त आर्थिक व्यवहार कॅशलेस करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी केंद्राकडून कॅशलेस व्यवहारांवर सवलत देण्याच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनीही मिळकत कराचा आॅनलाइन भरणा करणाऱ्यांना ५ टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेसमोर मांडला होता. मात्र मुख्य सभेमध्ये हा प्रस्ताव मार्च २०१७ च्या कार्यपत्रिकेवर घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आयुक्तांनी मार्चची वाट न पाहता त्यांचा विशेषाधिकार वापरून ही योजना लागू केली आहे.
महाराष्ट्र मनपा अधिनियम परिशिष्ट ८ नियम ५१ अन्वये शास्ती, फी किंवा वसुलीचा खर्च पूर्णत: किंवा अंशत: माफ करण्याचा अधिकार पालिका आयुक्तांना आहे. त्याआधारे मिळकतकराच्या थकबाकीची रक्कम एकरकमी आॅनलाइन भरल्यास ५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मिळकतकर विभागाने आॅनलाइन पद्धतीने जास्तीत जास्त कर जमा व्हावा, यासाठी पुढाकार घेतला होता. त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला असून दोन लाखांपेक्षा जास्त मिळकतदारांनी आॅनलाइन कराचा भरणा केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ६८ टक्के इतक्या प्रमाणात वाढले आहे. प्रशासनाकडे आॅनलाइनद्वारे १८२ कोटी रुपयांची रक्कम जमा
झाली आहे.