इंदापूर शहरात ३३ कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:09 IST2021-02-08T04:09:37+5:302021-02-08T04:09:37+5:30
इंदापूर : इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विचाराचे नगरसेवक निवडून आले. मात्र, नगराध्यक्षपद विरोधकांच्या विचाराचे आले असल्याने आपली संधी गेली. ...

इंदापूर शहरात ३३ कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ
इंदापूर : इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विचाराचे नगरसेवक निवडून आले. मात्र, नगराध्यक्षपद विरोधकांच्या विचाराचे आले असल्याने आपली संधी गेली. मात्र, यंदा इंदापूर नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात द्या. सर्वाधिक विकास करून दाखवला नाही तर नावाचा अजित पवार नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
इंदापूर शहरातील विविध विकासकामांच्या शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहाराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले आदी मान्यवर उपस्थित होते. विविध विकासकामांचा शुभारंभ शनिवार सकाळी बाबा चौक येथे पार पडल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवरामध्ये जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
पवार म्हणाले की, बारामती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. बारामती शहराच्या विकासकामांची प्रगती पहा. इंदापूरची नगरपालिका विरोधकांच्या हातात आहे त्याची प्रगती पाहा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांची नवीन टीम तयार करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना जाहीर सभेत सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की, इंदापूर नगरपरिषदेवर विरोधकांची सत्ता असताना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून आम्ही ३३ कोटी रुपयांचा निधी आणला आहे. त्या माध्यमातून वाढीव हद्दीतील विकासकामांना प्रथम प्राधान्य देणार असून, शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
या वेळी विविध विकासकामांचा शुभारंभ करताना नगरसेवक अनिकेत वाघ, स्वप्नील राऊत, पोपट शिंदे, अमर गाडे, गजानन गवळी, नगरसेविका मधुरा ढवळे, हेमलता माळुंजकर, राजश्री मखरे, स्वीकृत नगरसेवक प्रशांत शिताप, माजी उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, सामजिक कार्यकर्ते राजेंद्र चौगुले, वसंतराव माळुंजकर, प्रा. अशोक मखरे, वसीम बागवान, मनोज पवार, मनोज चौगुले, रामदास चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
इंदापूर शहरातील बाबा चौक येथे विविध विकासकामांचा शुभारंभ करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व नगरसेवक मान्यवर