Share Market: 'झटपट व्हा श्रीमंत...' गुंतवणुकीचा सल्ला अन् तुमच्या पैशांवर ‘डल्ला’

By नारायण बडगुजर | Published: August 17, 2022 01:53 PM2022-08-17T13:53:31+5:302022-08-17T13:53:49+5:30

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले

In Pimpri fraud by asking to invest in the stock market increased | Share Market: 'झटपट व्हा श्रीमंत...' गुंतवणुकीचा सल्ला अन् तुमच्या पैशांवर ‘डल्ला’

Share Market: 'झटपट व्हा श्रीमंत...' गुंतवणुकीचा सल्ला अन् तुमच्या पैशांवर ‘डल्ला’

Next

पिंपरी : चांगला परतावा देण्याच्या आमिषाने तसेच शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. गुंतवणुकीचा सल्ला देण्याच्या बहाण्यानेदेखील लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. त्यामुळे गुंतवणूक करताना आणि त्यासाठी सल्ला घेताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी, कारण यातून कोणी तुम्हाला फसवत तर नाही ना, याबाबत सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

‘क्विक मनी, झटपट व्हा श्रीमंत, असा कमवा पैसा, स्मार्ट अर्निंग’ अशा विविध नावांनी सोशल मीडियातून सल्ला देणारे काही स्वयंघोषित गुंतवणूक गुरू त्यांचे व्हिडिओ व्हायरल करतात. अशा व्हिडिओंना लाइक, शेअर करण्याचे प्रमाणही मोठे आहेत. याचाच गैरफायदा घेत काही जण त्यांचा संपर्क क्रमांकही शेअर करतात. त्यावर संपर्क करण्यास सांगतात. त्यावर संपर्क करणाऱ्या व्यक्तींना लिंक दिली जाते. त्यावर क्लिक करून माहिती भरण्यास सांगून फसवणूक करतात.

ट्रेडिंगचे ‘ट्रेडिंग’

ट्रेडिंगबाबत सध्या मोठी उत्सुकता दिसून येते. आम्ही ट्रेडिंग करून नफा कमावला आणि झटपट श्रीमंत झालो. कोणतेही काम न करता आमची कमाई सुरू आहे, असे सांगून ट्रेडिंग करण्यास भाग पाडले जाते. ट्रेडिंगबाबत मोठा ट्रेंड सध्या आहे. शेअर बाजार म्हणजे नेमके काय, याबाबत माहिती नसतानाही अनेकांना गुंतवणूक करण्यास सांगितले जाते.

बिटकाॅइनच्या माध्यमातून गंडा

बिटकाॅइनमधून मोठा फायदा होतो, असे सांगून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. त्यासाठी कर्ज, हातउसने करून लाखो रुपये गुंतवले जातात. गुंतवणूक करण्याचे पर्याय असलेल्या काही वेबसाइटही आहेत. अशाच एका वेबसाइटवरून गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. बिटकाॅइनचे दर कमी जास्त झाल्याचे काही दिवस वेबसाइटवरून दर्शविण्यात येत होते. त्यानंतर आरोपींनी पैसे न दिल्याने फसवणूक झाल्याचे समोर आले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

वेबसाइट किंवा वाॅलेटवर गुंतवणूक करू नका. संबंधित बँकेचे खाते अधिकृत आहे का, अशा गुंतवणुकीला भारतीय कायद्यानुसार मान्यता आहे का, संबंधित संस्था, कंपनी किंवा व्यवसाय अधिकृत आहे का, सल्ला देणारी व्यक्ती कोण आहे, याची खातरजमा करावी. केवळ विश्वासावर गुंतवणूक करण्याचे टाळावे. - डाॅ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल

Web Title: In Pimpri fraud by asking to invest in the stock market increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.