शिक्षणाबरोबरच मैदानी खेळालाही महत्त्व द्या
By Admin | Updated: June 12, 2017 01:13 IST2017-06-12T01:13:02+5:302017-06-12T01:13:02+5:30
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाला महत्त्व दिल्यास सुदृढ समाजाची निर्मिती होऊ शकेल, असा आशावाद आमदार दत्तात्रय भरणे यांनी येथे व्यक्त केला

शिक्षणाबरोबरच मैदानी खेळालाही महत्त्व द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाला महत्त्व दिल्यास सुदृढ समाजाची निर्मिती होऊ शकेल, असा आशावाद आमदार दत्तात्रय भरणे यांनी येथे व्यक्त केला. येथील मारकड कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे अध्यक्षस्थानी होते. शिवव्याख्याते डॉ. लक्ष्मण आसबे या वेळी उपस्थित होते.
भरणे म्हणाले, की मारकड कुस्ती प्रशिक्षण केंद्रासारख्या क्रीडा माध्यमांनी कुस्तीसारखा मर्दानी क्रीडाप्रकार ग्रामीण भागात जिवंत ठेवला आहे.
अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, ‘‘मुलांना ज्या क्रीडाप्रकारात रस आहे त्या क्रीडाप्रकाराकरिता पालकांनी त्यास प्रोत्साहन दिले तर निश्चितच यश मिळते. आयुष्यात सूटबूट कधीही मिळतील, पण निरोगी शरीर मिळत नाही. याची जाणीव नव्या पिढीने ठेवावी. कसलेही व्यसन करू नये. मोबाईलचा अतिरेक टाळावा.’’
या वेळी डॉ. लक्ष्मण आसबे यांचे भाषण झाले. मारकड कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक मारुती मारकड यांनी प्रास्ताविक केले. कुस्ती पंच शरद झोळ यांनी सूत्रसंचालन केले. वस्ताद अशोक करे यांनी आभार मानले. बाळा ढवळे, डॉ. शशिकांत तरंगे, दत्तात्रय जाधव, माऊली शिंदे, अॅड. संदीपान भोसले, दत्तू भिसे, हरिदास मारकड व कुस्तीरसिक या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आबा शिंगाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात १५७ कुस्तीगीरांनी सहभाग घेतला. पाच मुलीही सहभागी झाल्या होत्या. त्यांना एनआयएस कुस्ती कोच माधुरी घराळ यांनी प्रशिक्षण दिले. सन २००० ते २००८ असे प्रत्येक वर्षाचा एक गट करून, नऊ वयोगटात शिबिरार्थीची विभागणी करण्यात आली होती. शिबिरार्थींना आधुनिक कुस्ती प्रशिक्षणाबरोबरच धावणे, शारीरिक शिक्षण, दोर चढणे, योगासने, पायाभूत जिम्नॅस्टिक आदींचे धडे देण्यात आले.