अवैध वाहनांवर शिवसेनेचे खळ्ळ खट्याक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:18 AM2018-08-28T01:18:59+5:302018-08-28T01:19:22+5:30
पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी ते चाकणदरम्यान काही दिवसांपासून होत असलेली वाहतूककोंडी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही.
चाकण : पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी ते चाकणदरम्यान काही दिवसांपासून होत असलेली वाहतूककोंडी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने रस्त्यावरून हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे अखेर रविवारी (दि. २६) रात्री साडेआठच्या सुमारास शिवसेनेने खळ्ळ खट्याक आंदोलन करून वाहतुकीला अडथळा ठरणारी अवैध प्रवासी वाहतुकीची अनेक वाहने फोडली.
महामार्गावरील वाहतूककोंडीला अवैध प्रवासी वाहने जबाबदार असून ही अवैध वाहतूक बंद करावी, अशी मागणी आमदार गोरे यांनी सातत्याने करून अवैध वाहतुकीबाबत अधिवेशनात आवाज उठविला होता. त्याचप्रमाणे अवैध वाहतूक बंद करण्याबाबत चाकण नगर परिषदेत ठराव करूनही पोलीस ही वाहतूक बंद करीत नसल्याने अखेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन छेडले. पुणे-नाशिक महामार्गावर येथील तळेगाव चौकात व आंबेठाण चौकात आमदार सुरेश गोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे अवैध प्रवासी वाहने चालविणाऱ्या मंडळींनी वाहनांसह चौकांमधून पोबारा केला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मांजरे, ग्राहक सेनेचे जिल्हा उपप्रमुख लक्ष्मण जाधव, उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, नगरसेवक प्रवीण गोरे आदी कार्यकर्त्यांनी अवैध वाहनांवर कारवाई केली.
पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी अवैध वाहतूक रिक्षांमुळे होत आहे. पोलिसांना आर्थिक फायदा होत असल्याने पोलीस ती बंद करीत नाहीत. त्यामुळे या वाहतुकीवर कार्यकर्त्यांनी हातोडा टाकला आहे. ही अवैध वाहतूक बंद केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
- सुरेश गोरे, आमदार
आमदार गोरेंसह अकरा जणांवर गुन्हा
/>
खेड : आठ ते नऊ रिक्षा तोडफोडप्रकरणी खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्यासह अकरा जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ आॅगस्ट रोजी आमदार सुरेश गोरे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, नगरसेवक प्रवीण गोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी किरण मांजरे, लक्ष्मण जाधव, राहुल गोरे यांच्यासह काही लोकांनी तळेगाव चौकातील आठ ते नऊ रिक्षा वाहतुकीस अडथळा निर्माण करतात, हे कारण देऊन फोडल्या. भोसरी परिसरातील प्रवाशी वाहतूक करणाºया या रिक्षा होत्या. या रिक्षांच्या काचा, लाईट फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. मारुती अशोक शेवाळे यांनी फिर्याद दिली आहे.