जीवघेणी अवैध प्रवासी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 02:06 IST2016-10-13T02:06:35+5:302016-10-13T02:06:35+5:30
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरूच असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येते. मात्र, शहरात ठिकठिकाणच्या चौकातून

जीवघेणी अवैध प्रवासी वाहतूक
पिंपरी : अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरूच असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येते. मात्र, शहरात ठिकठिकाणच्या चौकातून रिक्षामध्ये नियमापेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक केली जात असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रत्यक्ष केलेल्या प्रवासामध्ये दिसून आले. शिवाय, ही अवैध वाहतूक पोलिसांसमोर बिनधास्तपणे होत आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील चिंचवड स्टेशनपासून चिंचवडगाव, थेरगाव, वाकडकडे जाण्यासाठी प्रवासी, विद्यार्थी व नोकरदार वर्गाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. चिंचवडगावाकडे जाण्यासाठी पीएमपीच्या दर दहा मिनिटाला बसदेखील आहेत. मात्र, बस वेळेवर न आल्यास बहुतांश प्रवासी खासगी रिक्षाने प्रवास करत असतात. याचा फायदा घेऊन येथील रिक्षावालेदेखील रिक्षात तीन किंवा जास्तीत जास्त चार प्रवासी बसविण्याचा नियम असताना चक्क आठ प्रवासी बसवून वाहतूक करताना दिसून आले. एका चालकाने रिक्षात चार युवकांना बसविले असताना, पुन्हा तीन महिला आल्यावर चालकाने त्या युवकांना पुढे बसविले.
डांगे चौकातून हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जादा प्रवासी मिळण्यासाठी काही रिक्षाचालकांनी रस्त्यावरच बेशिस्तरीत्या रिक्षा उभ्या केलेल्या दिसून आल्या. या वेळी आठ प्रवासी क्षमता असलेल्या रिक्षामध्ये सहा महिला मागे आणि दोन युवक पुढे बसलेले होते. या वेळी महिलांनी चालकाला रिक्षा मार्गक्रमण करण्याची विनंतीदेखील केली. मात्र, चालकाने रिक्षा सुरू न करता, जादा प्रवाशांची वाट बघितली. त्यानंतर दोन युवती व दोन युवक आले. यापैकी कोंबून मागे बसविले, तर दोन युवकांनादेखील दाटीवाटीने त्याच्या शेजारी बसवून हिंजवडीकडे गेला. दरम्यान, या वेळी रिक्षातील एका महिलेने ‘आम्हालाच व्यवस्थित बसायला जागा नसताना यांना कुठे बसविणार?’ असा प्रश्न चालकाला विचारल्यावर, ‘चालकाने आम्ही पंधरा प्रवासी नेतो. नियमाप्रमाणे प्रवासी बसविल्यावर आम्हाला कसे परवडेल? आमचाही पोटापाण्याचा प्रश्न असल्याचे’ उत्तर देऊन प्रवासी महिलेला शांत केले.
डांगे चौकातून काळेवाडी फाटा आणि औंध रुग्णालयाकडे जाणाऱ्या एका रिक्षामध्ये तीन वयोवृद्ध महिला व एक युवक बसलेला होता. चालकाने रिक्षा सुरू न करता काळेवाडी फाटा, औंध, शिवाजीनगर असा आवाज देऊन प्रवाशांना जमा करताना
दिसून आला. त्या वेळी पाच
प्रवासी आले. त्यामधील एकाला वयोवृद्ध महिलांच्याच शेजारी दाटीवाटीने बसविले. तर उर्वरित चार जणांना पुढे बसवून रवाना झाला. त्यानंतर दुसऱ्या एका रिक्षाचालकानेदेखील पुढे चार
आणि मागे पाच महिला व एक
लहान मुलगी असे एकूण दहा प्रवासी बसविले. (प्रतिनिधी)