निगुडघर येथे अवैध दारूविक्री
By Admin | Updated: May 10, 2017 03:52 IST2017-05-10T03:52:25+5:302017-05-10T03:52:25+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यमार्ग व महामार्गावरील ५०० मीटर अंतरावरील सर्व दारूविक्री बंद करण्याचा निर्णय झाला असला

निगुडघर येथे अवैध दारूविक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यमार्ग व महामार्गावरील ५०० मीटर अंतरावरील सर्व दारूविक्री बंद करण्याचा निर्णय झाला असला तरी निगुडघर येथे मात्र अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून, उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. यामुळे हिर्डोशी खोऱ्यातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
महामार्गावरील आणि राज्यमार्गावरील हॉटेल, ढाबे, बार, बिअर शॉपी, वॉईन शॉप येथील दारूविक्री बंद करण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्याने त्यांची कडक अंमलबजावणी करण्यात आली. मात्र ती काही दिवसच होती. महाड-पंढरपूर हा राज्य मार्ग व सध्याचा राष्ट्रीय मार्गावरील निगुडघर (ता. भोर) येथे बेकायदेशीर अवैध दारूधंदे सुरू आहेत. याचा त्रास गावातील महिलांसह नागरिकांना होत आहे. त्यामुळे हे अवैध धंदे बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करून भोर पोलीस निरीक्षकांना देण्यात आला. मात्र त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
महाड-पंढरपूर रस्त्यावर सुमारे १२०० लोकवस्तीचे निगुडघर गाव आहे. गावात रविवारी आठवडा बाजार भरत असल्याने व दवाखान्यामुळे आजूबाजूच्या १५ ते २० गावांतील नागरिक बाजारासाठी व विविध कामांसाठी निगुडघरला येतात. शिवाय महापंढरपूर रस्ता असल्याने सतत वाहनांची व लोकांची गर्दी असल्याने येथील हॉटेलात देशी, विदेशी हातभट्टी दारूची सर्रासपणे बेकायदेशीरपणे विक्री केली जाते. सदरच्या अवैध धंद्यांमुळे गावातील व बाहेरून येणारे नागरिक दारू पिऊन दररोज भांडणतंटे मारीमारी होतात. याचा त्रास गावातील स्थानिकांना सहन करावा लागत आहे.