Illegal collection of contractors from 'pay and park' facilities; Notices sent by PMC | 'पे अँड पार्क' सुविधेतून ठेकेदारांची बेकायदा वसुली ;  महापालिकेने पाठवल्या नोटीसा  
'पे अँड पार्क' सुविधेतून ठेकेदारांची बेकायदा वसुली ;  महापालिकेने पाठवल्या नोटीसा  

पुणे : शहराच्या विविध भागांमध्ये महापालिकेकडून ठेकेदारी पद्धतीने पे अ‍ॅन्ड पार्कची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परंतु यातील अनेक ठिकाणी ठेकेदारांकडून वाहनतळाबाबत घातलेल्या अटी व शर्तींचे उल्लघंन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी काही वाहनतळांची पाहणी केली. यामध्ये महापालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणे, सीसीटीव्ही कॅमेरे न लावणे, महापालिकेच्या निविदांमध्ये घातलेल्या अटींचा भंग करण्यात आल्याचे लक्षात आले. याबाबत मालमत्ता विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी सर्व ठेकेदारांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. 

याबाबत मुठे यांनी सांगितले की, शहरामध्ये सुमारे ८ ते १० ठिकाणी महापालिकेकडून पे अ‍ॅन्ड पार्कची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया राबवून खासगी ठेकेदारांना या जागा पार्किंगसाठी चालविण्यास देण्यात आल्या आहेत. परंतु निविदामध्ये घातलेल्या अनेक अटी व शर्तींचा ठेकेदारांकडून भंग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार पुन्हा 
एकदा शहरातील सर्व पार्किंग ठेकेदारांना नोटिसा देऊन वाहनतळांची वार्षिक देय रक्कम त्वरित भरणे, कर्मचाºयांना आयकार्ड देणे, नागरिकांशी गैरवर्तन केल्यास कर्मचाºयांवर कारवाई करणे, वाहनतळाची नियमित स्वच्छता करणे आदी अनेक सूचना केल्या आहेत. 

संगणकीकृत पावती नाहीच !

शहरातील सर्व पे अ‍ॅन्ड पार्कच्या ठिकाणी पार्किंग शुल्क वसुली पावत्यांचे संगणकीकरण करणे बंधनकारक आहे. परंतु अद्यापही अनेक ठिकाणी छापील पावत्या दिल्या जातात. यामध्ये इन व आऊट टाईमचा उल्लेख नसतो. तसेच पावतीवर ठेकेदारांचे नाव व फोन नंबर देणेदेखील आवश्यक आहे. यामुळे नागरिकांना काही तक्रार असल्यास थेट ठेकेदारांशी संपर्क करता येईल. यामुळे शहरातील सर्व पे अ‍ॅन्ड पार्कच्या ठिकाणी संगणकीकरण करुन घेण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. 


Web Title: Illegal collection of contractors from 'pay and park' facilities; Notices sent by PMC
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.