धरण, कालव्यातील धोक्यांकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: March 25, 2015 00:31 IST2015-03-25T00:31:16+5:302015-03-25T00:31:16+5:30
पवना आणि नागपूरमधील धरणांत रविवारी एकूण ११ मुलांचा बुडून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण आणि शहरातून जाणाऱ्या कालव्याचा आढावा घेतला

धरण, कालव्यातील धोक्यांकडे दुर्लक्ष
पुणे : पवना आणि नागपूरमधील धरणांत रविवारी एकूण ११ मुलांचा बुडून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण आणि शहरातून जाणाऱ्या कालव्याचा आढावा घेतला असता निराशाच हाती आली आहे. धरण आणि कालवा परिसरामध्ये पवना आणि नागपूरप्रमाणे उद्भवू शकणाऱ्या धोक्यांकडे संबंधित यंत्रणेचे लक्षच नसल्याचे निदर्शनास आले.
रविवारच्या दुर्घटनेनंतर ‘लोकमत’ने सोमवारी आणि मंगळवारी खडकवासला धरण आणि कालव्याची पाहणी केली. खडकवासला येथील अपुरी सुरक्षाव्यवस्था पाहता पवना वा नागपूर प्रकरणाची पुनरावृत्ती आपल्याकडेही घडल्यास नवल वाटायला नको, अशी परिस्थिती आहे. पोहता येत असो वा नसो अनेक मुले, मुली, युवक कालव्यामध्ये बिनधास्तपणे पोहण्याचा आनंद लुटत होते. एखादी व्यक्ती बुडाल्यास या ठिकाणी कोणतीही सुरक्षाव्यवस्था असल्याचे आढळले नाही.
सिंहगड रस्ता परिसरातील जनता वसाहतीतून गेलेल्या कालव्याची पाहणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले. जनता वसाहतीतून कालव्याच्या मार्गाने पुढे गेल्यावरही हेच चित्र दिसले. कालव्यात पोहणारी मुले, मुली, युवक तसेच आजूबाजूच्या वस्तीतील नागरिकांसोबत संवाद साधला असता बहुतेकांना पवना आणि नागपूरमधील दुर्घटनेची माहिती नव्हती. असे घडल्याचे सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर ‘आपल्याला काय त्याचे?’ पद्धतीचे भाव होते.
अनेक ठिकाणी कालव्याची भिंत तुटलेली होती. यातील काही ठिकाणी परिसरातील लोकांनी टाकलेला कचरा आणि घाण साचलेली होती. साहजिकच ही घाण पाण्यात मिसळत होती आणि तेथेही लहान मुले-मुली सूर मारण्याचा खेळ करीत होती. कालव्याची भिंत तुटलेल्या काही ठिकाणी पाण्याने जवळची जमीन पोखरली बाहे. यामुळे तेथील रस्ता धोकादायक झाला आहे. या रस्त्यावरून दुचाकीस्वाराचा तोल जाऊन तो गाडीसकट कालव्यात पडण्याचा धोका आहे. कालव्याजवळील वसाहतीतील महिला पाण्यात उतरून कपडे धुतात. त्याचवेळी त्यांची लहान मुले धोकादायकपणे पाण्यात खेळत असतात.
युवकांसोबत अगदी ७-८ वर्षांची मुलेदेखील कालव्यावरील पुलांच्या कठड्यावर उभी राहून १५ ते २० फूट उंचीवरून खोल पाण्यात उड्या मारत होती. सर्वांसमोर हा जीवघेणा खेळ सुरू असताना कुणीही त्यांना हटकले नाही. या मुलांना विचारले असता ती म्हणाली, ‘‘हा खेळ तर आम्ही नेहमीच खेळतो. काहींना पोहता येत नाही. त्यांना बाकीचे पोहणारे सांभाळून घेतात. पोहता न येणाऱ्याने उडी मारल्यानंतर तो बुडायला लागतो. आम्ही गंमत म्हणून थोडा वेळ त्याला गटांगळ्या खाऊ देतो आणि नंतर बाहेर काढतो. अशाच पद्धतीने नंतर ही मुले पोहणे शिकतात.’’
मंगळवारी गोळीबार मैदानाजवळ धोबीघाट परिसरात एका २० वर्षीय युवकाचा पोहताना बुडून मृत्यू झाला. लहान मुलांच्याबाबतीत अशा घटना घडणे सहज शक्य आहे.
(प्रतिनिधी)
सुरक्षारक्षकांचे दुर्लक्ष
४खडकवासला धरण परिसरात सुरक्षारक्षक केवळ नावालाच होते. ते बराच वेळ धरणाच्या एका बाजूला घोळक्याने उभे होते. एक महिला आपल्या ६-७ वर्षांच्या मुलाचे पोहतानाचे फोटो काढत होती. युवक, युवतींचे अनेक ग्रुप, प्रेमी युगुल पाण्यात उतरून मजा लुटत होते, मोबाईल-कॅमेऱ्यामध्ये फोटो काढत होते. यापैकी कुणालाही सुरक्षा रक्षकांनी हटकले नाही. सुरक्षिततेसाठी बांधलेली भिंत अनेक ठिकाणी पडली (की पाडली?) आहे. त्याचा उपयोग धरणाच्या पाण्यात उतरण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले.